करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड):- करमाळा तालुक्यातील सिना नदीच्या विलोभनीय तटावर वसलेल्या संगोबा येथील प्रसिद्ध श्री आदिनाथ महाराज मंदिरात महाशिवरात्री निमित्त भाविकांचा जनसागर उसळला होता. ‘जागृत देवस्थान’ म्हणून ख्याती असलेल्या या मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. गेल्या वर्षी आलेल्या महापुराच्या संकटातून सावरल्यानंतर यंदाचा उत्सव अत्यंत उत्साहात पार पडला.
महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर मंदिर परिसरात यात्रा भरवली जाते. यानिमित्ताने परिसरात विविध खेळण्यांची दुकाने, महिलांसाठी गृहोपयोगी वस्तूंचे स्टॉल्स आणि मिठाईची दुकाने थाटण्यात आली होती. अबालवृद्धांनी या बाजारात खरेदीचा आनंद लुटला, ज्यामुळे संपूर्ण परिसरात चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले.
पावसाळ्यात सिना नदीला आलेल्या भीषण महापुरामुळे संगोबा येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. त्यावेळी मंदिरालाही पाण्याचा वेढा पडला होता. मात्र, “आदिनाथ महाराजांच्या कृपेनेच आम्ही सर्वजण सुखरूप राहिलो,” अशी भावना ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील भाविकांनी यावेळी व्यक्त केली. या संकटाच्या काळात तत्कालीन दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः या भागाचा पाहणी दौरा करून ग्रामस्थांना धीर दिला होता, याची आठवणही यावेळी काढण्यात आली.

पुराच्या त्या भीषण परिस्थितीत तहसील प्रशासन, पोलीस प्रशासन आणि नगरपरिषद प्रशासनाने जिवाची बाजी लावून नागरिकांची सुटका केली होती. प्रशासनाच्या त्या सतर्कतेचे आणि नियोजनाचे कौतुक आजही स्थानिक नागरिकांच्या बोलण्यातून जाणवत होते. या पार्श्वभूमीवर, आजच्या उत्सवातही कोणतीही अडचण येऊ नये यासाठी देवस्थान ट्रस्ट आणि स्थानिक प्रशासनाने योग्य व्यवस्था ठेवली होती.
