संतुलित जीवनपद्धती उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली : डॉ. पद्मा खरड
भिगवण महाविद्यालयात निर्भय कन्या अभियानाचे आयोजन
(निलेश गायकवाड)
स्त्रीच्या वाटयाला संघर्ष हा असतोच, संघर्षमय जीवनामध्ये यशस्वी व्हावयाचे असेल तर प्रत्येक स्त्रीने स्वतःचे शारिरीक व मानसिक आरोग्य जपण्याची आवश्यकता आहे. स्त्रियांसाठी संतुलित जीवनपध्दती हीच खऱ्या अर्थाने उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे त्याचा प्रत्येक स्त्रीने अवलंब केला पाहिजे असे प्रतिपादन योग प्रशिक्षक डॉ. पद्मा खरड यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ व येथील इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने निर्भय कन्या अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तानाजी मगर होते. यावेळी पोलीस हवालदार दीपा मोरे व वैष्णवी राऊत, कराटे प्रशिक्षक संतोष नरुटे उपस्थित होते. यावेळी दिपा मोरे ‘मुली व महिलांनी स्वसंरक्षणाची घ्यावयाची काळजी’ याविषयी मार्गदर्शन केले. कराटे प्रशिक्षक संतोष नरुटे यांनी विद्यार्थीनींना प्रात्यक्षिकाद्वारे स्वसंरक्षणाचे धडे दिले. स्वप्निल माळवदकर आणि शिवानी काटे यांनी रक्ततपासणी करून त्या आधारे ‘रक्तघटक आणि आरोग्य’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. सुरेंद्र शिरसट यांनी, सूत्रसंचालन प्रा. सारिका पाटील यांनी, तर आभार प्रदर्शन प्रा. विनोद भुजबळ यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रा. वर्षा दराडे, प्रा. आरती काळंगे, प्रा. ऋतुजा हाके, प्रा. भाग्यश्री वाघमोडे तसेच प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
छायाचित्र ओळी- भिगवण – येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविदयालयांमध्ये आयोजित निर्भय कन्या अभियांना कार्यक्रमामध्ये बोलताना डॉ. पदमा खऱड…