माजी आमदार शिरीष चौधरींच्या वक्तव्याचा अमळनेरात तीव्र निषेध
अनिल पाटील गटाचा पालिकेवर मोर्चा; पुतळादहन, घोषणाबाजीने शहर तापले
अमळनेर : विक्की जाधव.
माजी आमदार शिरीष चौधरी यांनी नगराध्यक्ष पदग्रहण सोहळ्यात केलेल्या वक्तव्याने अमळनेरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आमदार अनिल पाटील यांच्या पत्नीबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप करत अनिल पाटील समर्थक, महिला आणि कार्यकर्त्यांनी काल अमळनेर नगरपालिकेवर जोरदार मोर्चा काढला. संतप्त जमावाने पालिकेसमोर एकत्र येत माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत तीव्र निषेध नोंदवला.
नगराध्यक्ष पदग्रहण समारंभात केलेल्या भाषणाचा एक भाग समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर शहरात संतापाची लाट उसळली. विशेषतः फेसबुक लाईव्हमधील क्लिप्स शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पसरल्या. या वक्तव्यामुळे महिलांचा अपमान झाल्याची भावना व्यक्त करत कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला.
पालिकेवर निघालेल्या मोर्चादरम्यान जमाव थेट शिरीष चौधरी यांच्या स्टेशन रोडवरील निवासस्थानी धडकला. तेथे प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. काही संतप्त महिलांनी चौधरी यांच्या घराच्या दिशेने बांगड्या फेकत प्रतीकात्मक निषेध व्यक्त केला. पोलिसांचा बंदोबस्त असूनही वातावरण तणावपूर्ण बनले होते.
पालिकेसमोर झालेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला, युवक व कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी घोषणा देत शिरीष चौधरींनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली. पुतळादहनानंतर हा मोर्चा कार्यालयाच्या दिशेने वळला.
यानंतर महाराणा प्रताप चौकात जोरदार घोषणाबाजी करत निषेध म्हणून टायर जाळण्यात आले. काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. अखेर हा मोर्चा आमदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानी पोहोचला, तेथे आंदोलनाचा समारोप करण्यात आला.
: मोर्चाला उशीर, कार्यकर्ते जमेना पदाधिकारी फोन उचलेना
पदग्रहणाच्या दुसऱ्या दिवशी दुपारी ३ वाजता मोर्चासाठी आवाहन करण्यात आले होते. मात्र ३.३० वाजेपर्यंत अपेक्षित पदाधिकारी व कार्यकर्ते जमा न झाल्याने काही काळ संभ्रमाचे वातावरण होते. मोर्चा निघणार की नाही बघणार यांची ही गर्दी वाढत होती. इकडे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या कार्यालयावर कार्यकर्त्यांची गर्दी येऊन बाहेर खुर्च्या टाकून कार्यकर्ते बसले होते. मात्र ग्रामीण भागातील कार्यकर्ते हळूहळू एकत्र येत ४.३० वाजेपर्यंत मोठा जमाव पालिकेसमोर जमला. यावेळी तिल्लोत्तमा पाटील व रिता बाविस्कर मंदाकिनी भामरे यांनी मनोगत व्यक्त करत महिलांच्या अपमानाचा तीव्र शब्दांत निषेध केला आणि शिरीष चौधरी यांनी आमदारांच्या पत्नीची जाहीर माफी मागावी, अशी ठाम भूमिका मांडली.
काय म्हणाले आमदार अनिल पाटील?
यानंतर जमावस सबोधित करताना आमदार अनिल पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली. ते म्हणाले, “तालुक्यात पुन्हा एकदा विचित्र संस्कृती आणि गुंडाराज डोकं वर काढत आहे. जर मर्द असाल तर माझ्याशी मुकाबला करा, महिलांचा अपमान का करता? एखाद्या महिलेला तिच्या नवऱ्याने स्वातंत्र्य दिलं म्हणून तिच्या चारित्र्यावर बोलणं योग्य आहे का?” अशा शब्दांत त्यांनी शिरीष चौधरींवर जोरदार हल्ला चढवला.
काय म्हणाले माजी आमदार शिरीष चौधरी?
दरम्यान, माजी आमदार शिरीष चौधरी यांनी आपली बाजू मांडताना सांगितले की, “माझ्या भाषणाचा छोटासा भाग काढून समाजकंटकांनी सोशल मीडियावर पसरवला. माझा कोणत्याही स्त्रीचा अपमान करण्याचा उद्देश नव्हता. आमची संस्कृती अशी नाही. तरीही कोणत्या स्त्रीला माझ्या वक्तव्यामुळे अपमान वाटला असेल तर ते शब्द मी माघारी घेतो. माझ्यासाठी प्रत्येक महिला माता-भगिनी समान आहेत.” तसेच हा प्रकार राजकीय हेतूने बदनामी करण्यासाठी केल्याचा आरोपही त्यांनी केला.
अमळनेरकरांच्या मनात काय?
या घटनेनंतर अमळनेरकरांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जाणकारांचे म्हणणे आहे की, सत्ता नसतानाही माजी आमदार शिरीष चौधरी यांना नगरपालिकेत सत्ता मिळाली आहे. त्यामुळे त्यांनी आता राजकीय वाद टाळून शहराच्या विकासावर लक्ष केंद्रित करावे. अशा वक्तव्यांमुळे अमळनेरचेच नुकसान होईल, असे मत व्यक्त होत आहे.
तर दुसरीकडे काही नागरिकांचे म्हणणे आहे की, आमदार अनिल पाटील यांनी विकासकामांसाठी कधी मोर्चा काढला नाही, माजी आमदार अनिल पाटील यांचे सोशल मीडियावर व्हायरल होणारे भाषणही मगरुरीचे होते. मग अशा आंदोलनातून अमळनेरचा विकास होणार आहे का? संपूर्ण व्हिडिओ ऐकला तर वक्तव्याचा उद्देश तसा नव्हता, मात्र राजकीय द्वेषातून मुद्दा पेटवण्यात आला, अशीही चर्चा शहरात रंगू लागली आहे.