अमळनेर नगरपरिषदेचा नवा अध्याय; डॉ. परीक्षित बाविस्कर उद्या नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार
अमळनेर : विक्की जाधव.
नगरपरिषद निवडणुकीत बहुमताने विजयी ठरलेले शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. परीक्षित बाविस्कर हे ०१ जानेवारी २०२६ या नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला असून, अमळनेर शहरात विकासाची गंगा वाहण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले आहे. अमळनेरच्या प्रगतीचा नवा भार आजपासून निश्चितच सुरू होईल, असा विश्वास नागरिकांतून व्यक्त होत आहे.
या पदभार स्वीकार सोहळ्यानिमित्त उद्या दुपारी ठीक ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहापासून अमळनेर नगरपरिषद कार्यालयापर्यंत भव्य विजय मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. या मिरवणुकीत अमळनेर शहरातील नवनिर्वाचित नगरसेवक-नगरसेविका, शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच माजी आमदार श्री. शिरीष चौधरी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. ढोल-ताशांच्या गजरात आणि जल्लोषात ही विजय मिरवणूक शहराचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.
नगरपरिषद कार्यालय परिसरात विजय मिरवणुकीचा समारंभ झाल्यानंतर डॉ. परीक्षित बाविस्कर यांचा सत्कार करण्यात येऊन अधिकृतपणे नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला जाईल. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविकाही पदभार स्वीकारणार आहेत. अमळनेरच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याच्या या नव्या प्रवासाला शहरवासीयांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, अमळनेरच्या उज्ज्वल भविष्यासाठी नव्या नेतृत्वाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.