अमळनेरच्या वैष्णवी पाटीलचा आंतरराष्ट्रीय शैक्षणिक ठसा
ऑक्सफर्ड विद्यापीठातील डेटा परिषदेत सादरीकरणाची मानाची संधी.
अमळनेर : विक्की जाधव.
मेहनत, चिकाटी आणि संधींचा योग्य उपयोग करत अमळनेर येथील वैष्णवी पाटील हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या शैक्षणिक गुणवत्तेची छाप उमटवली आहे. ग्लोबल व्ह्यू स्कूल, अमळनेर येथून दहावी पूर्ण केल्यानंतर तिने शासकीय पॉलिटेक्निक, जळगाव येथे माहिती तंत्रज्ञान शाखेत पदविका, तर पुण्यातील सिंहगड अभियांत्रिकी संस्थेतून अभियांत्रिकी पदवी संपादन केली. गुणवत्तेच्या जोरावर शिक्षण शुल्क सवलत व शिष्यवृत्ती मिळवत तिने आपला संपूर्ण शैक्षणिक प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला. पदवीदरम्यान नोकरीची संधी मिळूनही उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा धाडसी निर्णय तिने घेतला.
इंग्लंडमधील लीड्स विद्यापीठात ‘डेटा सायन्स आणि विश्लेषण’ विषयातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करताना तिने भारतीय उत्कृष्टता शिष्यवृत्ती मिळवली. पदव्युत्तर अभ्यासक्रमात सादर केलेल्या संशोधन प्रबंधामुळे तिला ऑक्सफर्ड विद्यापीठ येथे झालेल्या प्रतिष्ठित डेटा परिषदेत सादरीकरणाची संधी मिळाली, ही अमळनेरसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. लहान वयात वडिलांचे छत्र हरपल्यानंतरही आईने दिलेल्या बळावर आणि कुटुंबीयांच्या पाठिंब्याने वैष्णवीने जिद्द व सातत्याचे उदाहरण घालून दिले असून, तिची ही वाटचाल आजच्या विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.