यशाची वाट दाखवणारे वाचनतंत्र : गुलशन बेलदार यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन
अमळनेर : विक्की जाधव.
येथील खानदेश शिक्षण मंडळ संचालित प्रताप महाविद्यालयात स्पर्धा परीक्षांच्या दिशेने विद्यार्थ्यांना सक्षम घडविण्यासाठी एक आठवड्याच्या मार्गदर्शन कार्यशाळेचा भव्य प्रारंभ झाला. करिअर कौन्सिलिंग सेंटरच्या वतीने आयोजित या कार्यशाळेचे उद्घाटन इग्नाईट अकॅडेमी, पुणे येथील प्रसिद्ध मार्गदर्शक श्री. गुलशन बेलदार यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. प्रभारी प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सत्राला ९० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सरस्वती पूजन, दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास मंगल सुरुवात झाली, तर मान्यवरांच्या उपस्थितीने सभागृहात अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.
प्रमुख मार्गदर्शक श्री. गुलशन बेलदार यांनी स्पर्धा परीक्षांतील यशाचे गमक उलगडताना “यशासाठी योग्य वाचनतंत्र आत्मसात करणे अत्यावश्यक आहे,” असे ठाम प्रतिपादन केले. यूपीएससी व एमपीएससी परीक्षांचे स्वरूप, अभ्यासाची दिशा, पदवी स्तरापासून तयारीचे महत्त्व आणि सातत्यपूर्ण परिश्रम यावर त्यांनी भर दिला. केवळ माहितीपुरते नव्हे तर कौशल्यविकास व शिस्तबद्ध अभ्यासानेच यश मिळते, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. अध्यक्षीय भाषणात डॉ. हर्षवर्धन जाधव यांनी स्पर्धा परीक्षा म्हणजे कर्तृत्व सिद्ध करण्याचा सुवर्णमंच असल्याचे नमूद करत विद्यार्थ्यांना कठोर परिश्रमाचे आवाहन केले. कार्यशाळेच्या या उद्घाटन सत्रामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व स्पर्धात्मक जाणीव निर्माण झाली असून, यशाच्या दिशेने एक भक्कम पाऊल टाकले गेले आहे.