बारामतीचे माजी प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ७० हजारांची लाच घेताना अटक; घरझडतीत ४.२५ कोटींची मालमत्ता उघड
बारामती/नागपूर – वर्षा चव्हाण
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून बारामतीसह इतर ठिकाणी सेवेत असलेल्या राजेंद्र सदाशिव केसकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ७०,००० रुपयांची लाच स्वीकारताना गुरुवारी (दि. ४) नागपुरात रंगेहात पकडले. या कारवाईनंतर त्यांच्या अवाजवी मालमत्तेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
🟡जेसीबी पासिंगसाठी ७० हजारांची मागणी
तक्रारदाराने परराज्यातील जेसीबी वाहनाचे पासिंग करण्यासाठी संपर्क साधला असता केसकर यांनी ७०,००० रुपयांची मागणी केल्याचे समोर आले. ही मागणी त्यांच्या ओळखीच्या खासगी व्यक्ती राजेश रामनिवास माहेश्वरी (वय ५७, रा. रामनगर) यांच्या माध्यमातून करण्यात आली होती. तक्रारदाराने ACB कडे धाव घेतल्याने सापळा रचण्यात आला आणि दोघांना लाच स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले.
🔴घरझडतीत कोट्यवधींचा मुद्देमाल
अटकेनंतर ACB ने पुण्यातील केसकर यांच्या निवासस्थानी छापा टाकला. या कारवाईत खालीलप्रमाणे मालमत्ता आढळली—
रोख रक्कम : ₹६,६६,०००
सोने–चांदी : मोठ्या प्रमाणात
घर, प्लॉट, गुंतवणुकीसह स्थावर–जंगम मालमत्ता
अंदाजित एकूण किंमत : सुमारे ₹४ कोटी २५ लाख
अधिकाऱ्याचे वेतनमान पाहता ही संपत्ती संशयास्पद असल्याने ACB ने स्वतंत्र तपास सुरू केला आहे.
🟠न्यायालयात हजर, सेवा नोंदींची कसून छाननी
अटक करण्यात आलेल्या दोघांना नागपूर न्यायालयात हजर करण्यात आले. केसकर यांनी बारामतीसह विविध ठिकाणी सेवाकार्य करताना कुठे गैरव्यवहार झाले का, याची चौकशी सुरु आहे. त्यांच्या बारामतीतील कार्यकाळातही अनेक तक्रारी व चर्चांना ऊत मिळाला होता. दरम्यान, त्यांच्या ड्रायव्हरचीही सविस्तर चौकशी करण्याची मागणी स्थानिक पातळीवर होत आहे.
🟤आरटीओ कार्यालयात खळबळ
या कारवाईनंतर बारामती आणि संबंधित RTO कार्यालयांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. दुसऱ्या दिवशी कार्यालयात नेहमीची गर्दी कमी दिसली. कर्मचारी आणि एजंट वर्गामध्ये भीतीचे वातावरण असून नागरिकांमध्येही या घटनेची जोरदार चर्चा होत आहे.
ACB च्या तपासामुळे परिवहन खात्यातील अनेक अनियमिततेवर पडदा उघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.