बोराडी गावाचा जलसंपदा संवर्धनात आदर्श “जल तारा” प्रकल्पाची गावात यशस्वी अंमलबजावणी…

अपनी भाषा में पढ़े! Translate

       बोराडी – मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानांतर्गत बोराडी ग्रामपंचायतीने जलसंपदा संवर्धन, सांडपाणी व्यवस्थापन आणि पाणी पुनर्वापर या तिन्ही क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली आहे. “पाणी आडवा-पाणी जिरवा” आणि “जल तारा प्रकल्प” या दोन महत्त्वपूर्ण संकल्पनांचे एकत्रित लाभ ज्या गावाला मिळत आहेत, त्या गावांपैकी बोराडी हे एक आदर्श गाव म्हणून पुढे येत आहे.

          गावातील वाढत्या सांडपाणी समस्येचे निराकरण करण्यासाठी जल तारा प्रकल्प राबवण्यात आला. या प्रकल्पांतर्गत गावातील सर्व सांडपाणी एकत्रित करून त्यावर नैसर्गिक व वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया केली जाते. प्रक्रियेनंतर तयार होणारे स्वच्छ पाणी शेतीसाठी वापरले जाते, तर शिल्लक राहणारे पाणी गावाजवळील नाल्यात सोडले जाते. यामुळे जमिनीत पाण्याची झिरप वाढून भूजलस्तरात लक्षणीय सुधारणा दिसून येत आहे. पर्यावरण संरक्षण आणि जलपुनर्वापराचा हा उपक्रम शाश्वत विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरतो आहे.

याशिवाय गावाने “पाणी आडवा-पाणी जिरवा” या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम केले आहे. शाळा, महाविद्यालय, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, वसतिगृह, कार्यालये तसेच विविध सार्वजनिक ठिकाणी आणि वैयक्तिक घरांमध्ये शोषखड्डे तयार करण्यात आले. पावसाचे पाणी थेट जमिनीत मुरवण्याच्या या प्रयत्नांनी गावात जलसाठा वाढण्यास मोठी मदत झाली. गावाजवळील काळापाणी धरणातील गाळ काढून धरणाची जलसाठा क्षमता वाढवण्याचे महत्त्वाचे कामही ग्रामपंचायतीने हाती घेतले असून त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना मिळत आहे.

तसेच लेंढऱ्या नाल्यावर १४ बंधारे बांधून पाणी अडवण्यात आले आहे. या बंधाऱ्यांमुळे पावसाचे पाणी नाल्यात साठून राहते आणि आसपासच्या विहिरी-बोअरवेलचा जलस्तर वाढण्यास मदत होते. जलसंधारणाच्या या एकत्रित उपाययोजनांमुळे बोराडी गावात वर्षभर पाणी उपलब्ध राहण्यास मदत होत आहे.

या सर्व उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे बोराडी गावाने जलसंपन्नतेकडे भक्कम पाऊल टाकले असून पर्यावरणपूरक, स्वच्छ आणि शाश्वत पाणी व्यवस्थापनाचे आदर्श मॉडेल बनले आहे. ग्रामपंचायतीच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे आज बोराडी गाव जलसंवर्धनाच्या क्षेत्रात तालुका-जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातही एक प्रेरणादायी उदाहरण म्हणून पुढे येत आहे.

या उपक्रमास धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजीज शेख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा नोडल अधिकारी स्वरांजली पिंगळे, मा जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, तसेच गटविकास अधिकारी प्रदीप पवार यांचे मार्गदर्शन लाभले. ग्रामविकासाच्या कार्यात नैसर्गिक व वैज्ञानिक भूमिका अधोरेखित झाली.

या उपक्रमात सरपंच सुखदेव भिल, उपसरपंच राहुल रंधे, तसेच ग्रामपंचायत सदस्य विद्या रंधे, उर्मिला पावरा, नीता पवारा, सोनाली सत्तेसा, चांदारीबाई पावरा, आरती भिल, अनिता बडगुजर, मयुरी पवार, शारदा भिल, अनिल पावरा, चंद्रसिंग पवार, बबन पाटील, हारसिंग पावरा, भीमसिंग कुवर, निलेश महाजन, सतीश पवार, शशांक रंधे यांचा सक्रीय सहभाग लाभला.

उपक्रम यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत विस्तार अधिकारी संजय पवार, ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र साळुंखे, चंद्रकांत राजपूत, अंबादास सगरे, गणेश भामरे, गजू पाटील, चंद्रकांत बडगुजर, भूषण कुलकर्णी, मुकेश जाधव, उमेश पावरा, बादल पावरा, विजय पावरा तसेच सर्व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!