बारामतीत उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; विदेशी मद्यासह चारचाकी वाहन जप्त
बारामती/प्रतिनिधी – वर्षा चव्हाण
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्य वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने बारामती परिसरात धडक कारवाई केली. या कारवाईत सुमारे 6 लाख 97 हजार रुपये किंमतीचा विदेशी दारूचा साठा आणि एक स्विफ्ट डिझायर चारचाकी (एमएच-01-बीएफ-9165) वाहन जप्त करण्यात आले.
अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्पादन शुल्क विभागाच्या बारामती पथकाने मौजे शिरवली गावाच्या हद्दीत, सांगवी–बारामती रोडवरील माळेगाव फाटा येथे संशयित वाहनाची तपासणी केली. तपासणीदरम्यान मध्यप्रदेशात विक्रीस परवानगी असलेले, परंतु महाराष्ट्रात प्रतिबंधित असे मद्य मोठ्या प्रमाणात आढळून आले. जप्त करण्यात आलेल्या 20 बॉक्समध्ये —
रॉयल स्टॅग (180 मिली) : 11 बॉक्स
इम्पेरियल ब्ल्यू (180 मिली) : 4 बॉक्स
मॅकडॉवेल नं. 1 (180 मिली) : 5 बॉक्स
— असा साठा असल्याची माहिती पथकाने दिली.
घटनास्थळीच वाहन आणि मुद्देमाल ताब्यात घेऊन रामसिंह मोहबतसिंह राजपूत आणि महिपालसिंह राजसिंह राजपूत या दोघांना अटक करण्यात आली आहे.
या कारवाईत निरीक्षक शहाजी शिंदे, दुय्यम निरीक्षक सागर साबळे, मनोज होलम, गिरीशकुमार कर्चे, सहायक दुय्यम निरीक्षक गणेश जाधव, तसेच जवान निखिल देवडे, सुरेश खरात, सागर दुबळे आणि टी. एस. काळे सहभागी होते. पुढील तपास गिरीशकुमार कर्चे करीत असून याबाबतची माहिती निरीक्षक शहाजी शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.