भोसरीत देवेंद्र फडणवीसांना दाखवले काळे झेंडे; फडणवीस गो बॅक, दिवंगत अंकुशभाऊ लांडगे अमर रहेच्या दिल्या घोषणा
निलेश गायकवाड
भोसरी, दि. ६ – पिंपरी-चिंचवड महापालिकेने भोसरीत उभारलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनासाठी आलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भाजपचे माजी शहराध्यक्ष दिवंगत अंकुशराव लांडगे समर्थकांनी रविवारी (दि. ६) काळे झेंडे दाखवले. तसेच फडणवीस “गो बॅक”च्या आणि दिवंगत अंकुशभाऊ लांडगे अमर रहेच्या घोषणा दिल्या.
महापालिकेने विविध ठिकाणी उभारलेल्या विकासकामांच्या उद्घाटनासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे रविवारी शहरात आले होते. भोसरीमध्ये उभारलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्राचेही देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यासाठी ते येत असताना भाजपचे माजी शहराध्यक्ष दिवंगत अंकुशराव लांडगे समर्थकांनी त्यांना काळे झेंड दाखवले. गो बॅक गो बॅक देवेंद्र फडणवीस गो बॅक तसेच दिवंगत अंकुशभाऊ लांडगे अमर रहेच्या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.

दिवंगत अंकुशराव लांडगे समर्थकांचा तीव्र रोष पाहता देवेंद्र फडणवीस उद्घाटनस्थळी जाणारा मार्ग बदलण्यात आला. ते बदललेल्या मार्गावरून कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या ठिकाणी पोहोचले.