पारोळा तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी. अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा त्वरित पंचनामा करावा

अमळनेर : विक्की जाधव.
पारोळा तालुक्यातील शेडावे व बहादरपूर मंडळातील गावांमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचा तातडीने पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत मिळावी, या मागणीसाठी आज शेतकऱ्यांच्या वतीने नायब तहसीलदार अनिल पाटील यांना निवेदन देण्यात आले.

या वेळी सुभाष जिभाऊ पाटील. डॉ. प्रविण पाटील, रवी बापू, दिनेश पवार (गांधली) यांच्यासह पारोळा तालुक्यातील असंख्य शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, सततच्या पावसामुळे कापूस, सोयाबीन, मका व उडीद या पिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांचे जगण्याचे साधन धोक्यात आले आहे.

शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली की, पंचनामा तातडीने करून शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन निधीतून आर्थिक मदत मंजूर करण्यात यावी. तसेच शेतकऱ्यांना बी-बियाणे आणि खतासाठी अनुदान द्यावे, जेणेकरून येत्या हंगामात त्यांना उभारी मिळेल.