अमळनेरमध्ये “एकता दौड” सरदार पटेलांच्या जयंतीनिमित्त देशभक्तीचा जल्लोष!

अमळनेर : विक्की जाधव.
“देश एक, जनतेची एकता अखंड राहो” या घोषणांनी आज सकाळी अमळनेर शहर दुमदुमले! जळगाव जिल्हा पोलीस दल आणि अमळनेर पोलीस स्टेशन यांच्या वतीने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस २०२५ निमित्ताने “एकता दौड” मोठ्या उत्साहात पार पडली.

ही दौड महाराणा प्रताप चौक येथून सुरू होऊन श्री मंगळ ग्रह मंदिर येथे संपन्न झाली. या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन मा. आमदार श्री. अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी स्वतः दौडीत सहभागी होऊन नागरिकांना एकता, भाईचारा आणि देशभक्तीचा संदेश दिला.

या कार्यक्रमात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, पोलीस अधिकारी-अंमलदार, प्रतिष्ठित नागरिक, राजकीय-सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी, शासकीय कर्मचारी, शिक्षक, पत्रकार, वकील, माजी सैनिक, मॉर्निंग वॉक ग्रुप सदस्य तसेच विद्यार्थी वर्ग अशा ३०० ते ३५० नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात झाले. संपूर्ण दौड मार्गावर “एक भारत, श्रेष्ठ भारत” या घोषणांनी देशभक्तीचा माहोल निर्माण झाला.