खबरदार बुलेटच्या सायलेन्सर ने फटाके फोडाल तर खावी लागेल जेलची हवा. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम

बुलेट ने फटाके फोडणाऱ्या वाहनधारकांना अमळनेर पोलीस स्टेशनचे आवाहन..
अमळनेर : विक्की जाधव
अमळनेर शहरात अलीकडे बुलेट मोटरसायकलींच्या इंदोरी सायलेंसरमुळे निर्माण होणाऱ्या प्रचंड आवाजामुळे नागरिकांचा त्रास वाढला आहे. रात्रीच्या वेळी फटाक्यांसारखा आवाज करत सायलेंसरवर फटाके फोडणाऱ्या तरुणांमुळे शहरातील शांतता भंग होत असल्याच्या तक्रारी वाढू लागले आहेत. यावरून पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी अशा प्रकारच्या वाहनधारकांना कठोर इशारा दिला आहे “शहरात आवाज करून शांतता भंग करणाऱ्यांवर मोठी कारवाई होईल!”

शहरातील नागरिकांकडून प्राप्त झालेल्या अनेक तक्रारींवर तात्काळ लक्ष देत पोलीस निरीक्षक निकम यांनी सर्व पोलीस ठाण्यांना सूचना दिल्या आहेत की, बुलेट सायलेंसरद्वारे अनावश्यक आवाज करणाऱ्या वाहनधारकांवर विशेष लक्ष ठेवावे. फटाक्यांसारखा आवाज करणाऱ्या इंदोरी सायलेंसर असलेल्या वाहनांवर कारवाईची मोहीम सुरू होणार असून, दोषींवर ₹१०,००० दंड किंवा करावास अशी कठोर शिक्षा होऊ शकते.

“शहरातील शांतता अबाधित ठेवणे ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे. कोणीही कायद्याचा गैरवापर करून इतरांना त्रास देऊ नये,” असे आवाहन पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी केले. त्यांनी नागरिकांनाही विनंती केली आहे की, अशा प्रकारचे प्रकार दिसल्यास त्वरित पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

अमळनेर पोलिसांच्या या होणाऱ्या कार्यवाही मुळे आता शहरातील “धडधड” शांत होण्याची शक्यता आहे. कायद्याच्या भीतीने तरुणांनी सायलेंसरवर फटाके फोडण्याचे प्रकार थांबवले नाहीत, तर पोलिसांचा डंडा नक्कीच बोलेल अशी स्पष्ट भूमिका पोलिसांनी घेतली आहे.