अमळनेर ST आगारातील कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा प्रवाशांच्या डोळ्यांत आनंदाश्र
अमळनेर : विक्की जाधव.
प्रामाणिकतेचा आणि मानवतेचा एक उत्तम आदर्श आज अमळनेर आगारातील एस.टी. चालक आणि वाहकांनी घालून दिला आहे. आज दिनांक २६ ऑक्टोबर २०२५ रोजी अमळनेर ते अकोला अशी सेवा सुरू असताना, मलकापूर येथे एक गरीब जोडपे आपल्या मुलीला उपचारासाठी दवाखान्यात घेऊन बसमध्ये प्रवास करत होते. या मुलीच्या कानातील कर्णबधिरतेसाठी वापरले जाणारे यंत्र ज्याची किंमत सुमारे ₹३५,००० होती प्रवासादरम्यान बसमध्ये हरवले.

यानंतर बसमधील चालक आर. टी. ढवळे आणि वाहक मनोज पाटील यांनी तत्परता आणि प्रामाणिकता दाखवत ते यंत्र शोधून काढले. प्रवाशांची ओळख पटवून त्यांनी ते यंत्र परत दिले. हरवलेली वस्तू परत मिळाल्यावर त्या गरीब पालकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले. त्यांनी चालक-वाहकांना बक्षीस म्हणून ₹२००० देऊ केले, मात्र त्यांनी नम्रपणे नकार देत म्हणाले “ही आमची जबाबदारी आहे, सेवा हीच आमची ओळख!”

या घटनेमुळे अमळनेर आगार आणि जळगाव विभागातील एस.टी. कर्मचाऱ्यांची प्रतिमा आणखी उजळली आहे. प्रवाशांनी आणि स्थानिक नागरिकांनी दोन्ही कर्मचाऱ्यांचे कौतुक केले असून, “अशा प्रामाणिक कर्मचाऱ्यांमुळेच एस.टी. सेवेवरील विश्वास अधिक दृढ होतो,” अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
