शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गटाची प्रशासनाकडे मागणी.

अमळनेर : विक्की जाधव.
अमळनेर तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला आहे. काढणीला आलेल्या कापूस, मका आणि सोयाबीन या पिकांचा घास हिरावला गेल्याने बळीराजा निराशेच्या गर्तेत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या वतीने प्रशासनाकडे शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.

या संदर्भात अमळनेरचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात प्रशासनाने तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी, अशी मागणी व्यक्त करण्यात आली. पक्षाने स्पष्ट केले की, “पिकांचे नुकसान एवढे प्रचंड झाले आहे की, शासनाकडून तत्काळ हस्तक्षेप न झाल्यास शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती कोलमडेल.”

या वेळी मा. आमदार डॉ. बी. एस. पाटील, तालुकाध्यक्ष डी. एम. पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. अशोक पवार, शहराध्यक्ष प्रशांत निकम, युवक अध्यक्ष योगेश शिसोदे, किसान सेल तालुकाध्यक्ष मनोहर पाटील, महिला तालुकाध्यक्ष योजना पाटील आदींसह अनेक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. या शेतकरी उपस्थितीमुळे प्रशासनालाही परिस्थितीचे गांभीर्य जाणवले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाने सरकारला धारेवर धरत “शेतकऱ्यांना तातडीने मदत न मिळाल्यास आम्ही रस्त्यावर उतरून लढा उभारू.” अमळनेर तालुक्यातील बळीराजा आज मदतीच्या प्रतीक्षेत आहे आणि त्याच्या न्याय्य मागणीसाठी पक्ष एकदिलाने उभा राहिला आहे.