अमळनेरमध्ये भक्तिभावाचा महासागर श्री स्वामिनारायण मंदिरात अन्नकूट उत्सवात ७०० पदार्थांचा नेवैद्य, भक्तांच्या हृदयात आनंदसोहळा.

अमळनेर : विक्की जाधव.
दिवाळी आणि नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त आज BAPS श्री स्वामिनारायण मंदिर, अमळनेर येथे भव्य आणि दिव्य अन्नकूट उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. मंदिर परिसरात सकाळपासूनच “जय स्वामिनारायण” च्या घोषात भक्तांची मोठी गर्दी झाली होती. भगवान श्री स्वामिनारायण अक्षरपुरुषोत्तम महाराज, राधा कृष्ण देव आणि श्री घनश्याम महाराज यांच्या चरणी ७०० हून अधिक विविध व्यंजनांचा थाळ नेवैद्य अर्पण करण्यात आला. रंगीत थाळ, फुलांची सजावट, दीपमाळा आणि सुगंधी धूपाच्या सुवासाने मंदिर परिसर स्वर्गीय वाटू लागला.

संगीतमय वातावरणात आयोजित थाळ गाण्याने संपूर्ण सभागृह भक्तिरसात न्हाऊन निघाले. पूज्य अखंडमुनि स्वामी, जगदीश चौधरी, चंद्रकांत वाणी, प्रितम माणियार, चेतन चौधरी, विशाल चौधरी आणि योगेश बारी यांनी सुमधुर सादरीकरण करून कार्यक्रमाला भक्तिभावाचा रंग चढवला.

या प्रसंगी मा. आमदार अनिलभाईदास पाटील आणि मा. आमदार शिरीषदादा चौधरी यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. त्यांच्या स्वागतासाठी पूज्य योगिस्नेह स्वामी व अखंडमुनि स्वामी यांनी सुंदर पुष्पगुच्छ देऊन सत्कार आणि आरती केली. पूज्य योगिस्नेह स्वामींनी उपस्थित भाविकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत सांगितले, “प्रत्येक भक्ताच्या जीवनात आनंद, आरोग्य, समृद्धी आणि सत्कर्मांचा प्रकाश कायम राहो हीच भगवान श्री स्वामिनारायणांच्या चरणी प्रार्थना.” कार्यक्रमात नगरसेवक, व्यापारी संघटनांचे संचालक, लायन्स क्लब अध्यक्ष डॉ. संदीप जोशी, अर्बन बँकचे पदाधिकारी तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. सुमारे ११०० हून अधिक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला, आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भक्तिभावाची तेजोमय झळाळी दिसत होती.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अतुल सोनी, किशोरकुमार सोनी, अमरीश अग्रवाल, हरिकृष्ण सोनी, प्रितम मणियार, चंद्रकांत महाजन, नीरज अग्रवाल, श्यामकांत बागड, चेतन चौधरी, राजेश देशपांडे, उमेश भावसार, योगेश चौधरी, आदित्य सोनवणे आणि समस्त महिला मंडळ, युवती मंडळ, युवक मंडळ व पानखिडकी स्वामिनारायण मंडळ अमळनेर यांनी अथक परिश्रम घेतले.

भक्तिभाव, सेवा आणि प्रेमभावाने सजलेला हा अन्नकूट उत्सव केवळ धार्मिक नाही तर अमळनेरच्या सामाजिक ऐक्याचा आणि श्रद्धेच्या बंधाचा सोहळा ठरला.