तक्रारवाडी दीपोत्सव २०२५ उत्साहात साजरा;हनुमान मंदिर परिसरात दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघाला
(निलेश गायकवाड)
भिगवण : तक्रारवाडी ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘तक्रारवाडी दीपोत्सव २०२५’ उत्साहात साजरा करण्यात आला. हनुमान मंदिर परिसरात दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघालेला हा सोहळा गावकऱ्यांच्या उत्साहाने आणि एकतेच्या भावनेने भरून गेला होता. दिवाळी पाडव्याच्या या शुभमुहूर्तावर आयोजित या दीपोत्सवामध्ये ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
या सोहळ्याचे आयोजन समस्त ग्रामस्थ तक्रारवाडी यांच्या वतीने करण्यात आले होते. मंदिर परिसरात विविध दिव्यांच्या सजावटीसह परिसर उजळून निघाला होता. संध्याकाळी ६ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत पार पडलेल्या या कार्यक्रमात सर्व वयोगटातील नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला.
कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य राणी नितीन काळंगे, नितीन काळंगे, सतीश जगदाळे, संजय काळंगे रूशीकेश काळंगे दिपराज काळंगे तसेच अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. सर्वांनी मिळून दिव्यांनी मंदिर परिसर प्रकाशमान करून सामाजिक एकतेचा आणि परंपरेचा सुंदर संदेश दिला.
दीपोत्सव हा केवळ आनंदाचा सण नसून एकतेचा, संस्कृतीचा आणि श्रद्धेचा प्रतीक म्हणून दरवर्षी ग्रामस्थ हा उत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा करतात.