
अमळनेर पंचायत समितीत घरकुल घोटाळा अभियंता आणि ग्रामसेवकांच्या साठेलोट्यामुळे शासनाची फसवणूक!
अमळनेर : विक्की जाधव
भाग -2
अमळनेर पंचायत समिती अंतर्गत घरकुल योजनेंतर्गत मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे. घरकुल योजना राबवताना काही अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी मिळून शासन आणि जनतेची सरळ फसवणूक केल्याचे समोर येत आहे. संबंधित ठेकेदाराने प्रशासनाची धास्ती घेत पळ काढल्याची माहिती समोर आली असून, त्याच्यावर लवकरच कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणी पंचायत समितीतील घरकुल अभियंता याचे नाव चर्चेत असून, त्याने शासनाकडून मानधन घेत असतानाच स्वतःच्या नावाने खाजगी एजन्सी चालवल्याचा गंभीर आरोप आहे.

या अभियंत्याने स्वतःच ठेके घेतले, कमिशनच्या माध्यमातून लाखो रुपयांची लूट केल्याचे पुरावे ‘मार्मिक’ च्या हाती लागले आहेत. एवढंच नव्हे, तर नोंदणीच्या वेळी १०० रुपयांच्या स्टँप पेपरवर स्पष्टपणे नमूद केले असतानाही, संबंधित अभियंता शासन आणि जनतेला दोघांनाही फसवत असल्याचे समोर आले आहे. “शासनाचे मानधन घेऊन घरकुलांचे कमिशन खिशात” या चर्चेने संपूर्ण अमळनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

या गैरप्रकारात एकटा अभियंता नव्हे, तर काही ‘टिपटॉप ग्रामसेवकां’ चा देखील हात असल्याची चर्चा आहे. या साठेलोट्यामुळे अनेक पात्र लाभार्थ्यांना घरकुल योजनेंतर्गत घर मिळाले नाही, तर अपात्रांना लाभ देण्यात आले असल्याचे आरोप होत आहेत. गावागावांत या भ्रष्टाचाराची चर्चा रंगली असून, नागरिकांनी संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी सुरू केली आहे.

‘मार्मिक’ लवकरच या प्रकरणातील ठोस पुरावे कार्यवाहीसाठी प्रशासनासमोर सादर करणार आहे. दरम्यान, या घोटाळ्याशी संबंधित ग्रामसेवकाच्या “रंगेल हातांचा” सखोल तपास सुरू असून, लवकरच या साखळीतील आणखी मोठी नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागरिक मात्र एकच प्रश्न विचारत आहेत घरकुलाच्या नावाखाली सुरू असलेला हा भ्रष्टाचार कधी थांबणार आणि जबाबदार कोण?
पुढील वृत्त लवकरच.