अमळनेर नगरपरिषद निवडणुकीत मतदार यादीत मोठा घोळ! हरकती प्रक्रियेतील क्लिष्टतेमुळे उमेदवारांची दमछाक
अमळनेर : विक्की जाधव.
नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीत मोठा घोळ झाल्याची चर्चा शहरभर रंगली आहे. अनेक मतदारांचे नावे चुकीच्या प्रभागात नोंदवली गेल्याने उमेदवार आणि नागरिक या दोघांमध्येच संभ्रम निर्माण झाला आहे. हरकती नोंदवण्यासाठी प्रशासनाने अवलंबलेली गुंतागुंतीची पद्धत आणि नियमांची अपुरी माहिती यामुळे उमेदवारांची मोठी दमछाक होत आहे.

पूर्वी जर एखाद्या भागातील मतदारांची नावे इतरत्र गेली असतील, तर संबंधित कर्मचार्यांच्या माध्यमातून सामूहिक हरकती दाखल करून त्यांची शहानिशा करण्यात येत असे. त्यानंतर योग्य त्या प्रभागात मतदारांचा समावेश केला जात असे. मात्र, यंदा जबाबदार अधिकाऱ्यांना प्रक्रियेचे नियम नीट समजले नसल्याने मतदार व उमेदवार दोघांनाही प्रशासनाच्या चुकीचा फटका बसत आहे.

स्थानिक पातळीवरील जाणकार नागरिकांचे म्हणणे आहे की, अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यापूर्वी संबंधित प्रभागातील जबाबदार व अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन घेतले असते, तर असा गोंधळ निर्माण झाला नसता. या प्रशासकीय दुर्लक्षामुळे निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, मतदार यादीतील त्रुटी तातडीने दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.