गडखांब शाळेत विद्यार्थी–शिक्षकांच्या सहकार्याने बदलला वर्गाचा चेहरामोहरा!
शिक्षक आणि विदयार्थ्याच्या समन्वयाने शाळेच्या भिंती बोलू लागल्या..
अमळनेर : विक्की जाधव.
जि.प. उच्च प्राथमिक केंद्र शाळा, गडखांब येथे इयत्ता पहिलीच्या वर्गाचा आमूलाग्र बदल करून आकर्षक वातावरण निर्माण करण्यात आले आहे. शिक्षण अधिक आनंददायी आणि बालमैत्री बनविण्याच्या उद्देशाने विद्यार्थी, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य अभिमन आबा भिल यांनी मिळून वर्ग सजावटीचा उपक्रम राबवला. या उपक्रमात प्रत्येकाने सक्रिय सहभाग घेत वर्गाचे अंतरंग रंग, चित्रे आणि सर्जनशील सजावटीने उजळवले.

गटकार्य आणि समन्वयाच्या माध्यमातून साकारलेल्या या प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य आणि उत्साह निर्माण झाला आहे. बालचिमुकल्यांना शाळेचा वर्ग आता केवळ शिक्षणाचे केंद्र न राहता, आनंदाने शिकण्याचे ठिकाण बनला आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सजावटीच्या प्रक्रियेत सहभागी करून घेत, त्यांच्यातील कलागुणांना प्रोत्साहन दिले.या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरांवर कौतुक होत असून शाळा व्यवस्थापन समितीनेही याला पुढील वर्गांसाठी आदर्श प्रकल्प म्हणून गौरविले आहे. “विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हे फक्त पुस्तकी न राहता अनुभवातून घडावे” या उद्देशाने गडखांब शाळेतील हा प्रयत्न खऱ्या अर्थाने शिक्षणातील परिवर्तनाचा सुंदर संदेश देणारा ठरला आहे.