ठरलं अखेर! माजी आमदार शिरीष चौधरींचा शिंदे सेनेत अधिकृत प्रवेश ‘टायगर इज बॅक’ने शहरात रंगला कार्यकर्त्यांत उत्साह
अमळनेर : विक्की जाधव
अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. अमळनेरचे माजी आमदार श्री. शिरीष चौधरी यांनी अखेर उप-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे. मंगळवारी सायंकाळी त्यांच्या शिंदे गटात अधिकृत प्रवेशाचा कार्यक्रम होणार असून, यामुळे अमळनेर तालुक्यातील राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
आज अमळनेर येथे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेनंतर चौधरी यांनी हा निर्णय जाहीर केला. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत विविध चर्चा सुरू होत्या. काहींनी त्यांचा नंदुरबारकडे झुकाव असल्याचे सांगितले होते, मात्र त्यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम देत अमळनेर नगरपरिषदेतच भगवा फडकवण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात ‘टायगर इज बॅक’ अश्या चर्चांचा जोर आला असून, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. शिरीष चौधरी हे गेल्या काळात अपक्ष म्हणून तसेच भाजपाच्या तिकिटावरही विधानसभा निवडणुक लढवलेले आहेत. परंतु या वेळी त्यांनी शिंदे सेनेचा झेंडा हाती घेतल्याने स्थानिक राजकारणात मोठी समीकरणं बदलण्याची चिन्हं आहेत. आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चौधरी यांनी पूर्ण ताकदीने पुन्हा राजकीय मैदानात उतरायची तयारी केली असून, शिंदे सेनेला अमळनेरात बळकटी मिळणार असल्याचे राजकीय तज्ञांचे मत आहे. त्यांच्या प्रवेशामुळे अमळनेरच्या राजकीय रणांगणात नव्या टप्प्याची सुरुवात झाली आहे, हे निश्चित!