अवाजवी शाळा शुल्कवाढीवर लगाम: पालकांना तक्रार करण्याचा अधिकृत मार्ग खुला
मुंबई/प्रतिनिधी – वर्षा चव्हाण
राज्यात खासगी शाळांकडून आकारल्या जाणाऱ्या वाढत्या शुल्कामुळे पालकांवर आर्थिक ताण वाढत असताना शिक्षण विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. विभागीय स्तरावर शुल्क नियामक समित्या कार्यान्वित करण्यात आल्या असून, यामुळे आता पालकांना अवाजवी शुल्कवाढीविरोधात अधिकृतपणे तक्रार करता येणार आहे.
शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांनी काढलेल्या परिपत्रकानुसार, प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र शुल्क नियामक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समित्यांचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली असून, प्रादेशिक शिक्षण उपसंचालक हे पदसिद्ध सदस्य सचिव असतील.
🟢खासगी शाळांची फी लाखांच्या घरात
काही नामांकित खासगी शाळांमध्ये वार्षिक शुल्क एक लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे. प्रवेश शुल्क, विकास शुल्क आणि विविध अतिरिक्त शुल्कांमुळे पालकांचा एकूण खर्च मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पालक संघटनांच्या मते, यंदा अनेक शाळांनी १० ते २५ टक्क्यांपर्यंत शुल्कवाढ केली असून, काही ठिकाणी याहून अधिक वाढ झाल्याच्या तक्रारी आहेत.
🔴तक्रार नोंदविण्याची सुविधा
पालक आता संबंधित विभागीय शुल्क नियामक समितीकडे लेखी किंवा ऑनलाइन पद्धतीने तक्रार नोंदवू शकतात. आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करणे बंधनकारक असेल. शिक्षण विभागाने दूरध्वनी क्रमांक (020) 26122217 तसेच www.dydepune.co.in तसेच, dydpune.egov.gmail.com ई-मेलद्वारे तक्रारी स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
🟡शाळांसाठी पारदर्शकता बंधनकारक
शुल्क नियामक समित्यांच्या माध्यमातून शाळांच्या शुल्कवाढीवर नियंत्रण ठेवले जाणार असून, अनियमितता आढळल्यास कारवाईची तरतूद आहे. तसेच प्रत्येक शाळेला शुल्कवाढीबाबतची माहिती, समितीचे संपर्क तपशील आणि तक्रार प्रक्रिया पालकांना देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
शिक्षण विभागाने पालकांना आवाहन केले आहे की, अवाजवी शुल्कवाढ झाल्यास त्यांनी निर्धास्तपणे समितीकडे तक्रार नोंदवावी. सर्व तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल, असेही विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.