शिरपूरच्या प्रा. रजनीताई लुंगसे यांचा दुहेरी सन्मान : गुजरात मराठी पाठ्यपुस्तकात पाठ आणि भारत ज्योती प्रतिभासन्मान पुरस्कार प्राप्त
शिरपूर येथील नामवंत लेखिका, ज्येष्ठ समाजसेविका आणि विचारवंत प्रा. रजनीताई लुंगसे यांचे सामाजिक, शैक्षणिक आणि अध्यात्मिक क्षेत्रातील योगदान सातत्याने गौरवले जात आहे. गुजरात राज्यातील इयत्ता 7वीच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकात त्यांचा ‘संत गाडगे महाराज’ हा पाठ अभ्यासक्रमात समाविष्ट झाला आहे. ही अभिमानास्पद बाब आहे. या यशाबद्दल परीट समाज भगिनी, शिरपूर यांच्यातर्फे सौ. सीमाताई रंधे आणि सर्व पदाधिकारी भगिनींनी त्यांचा विशेष सत्कार आयोजित केला होता. प्रा. रजनीताई यांनी गुजरात शासन, मा. कदम मॅडम, श्री. निलेश पाटील, श्री. श्रीनिवास ढोले आणि अभ्यासक्रम मंडळ यांचे आभार मानले आहेत.याशिवाय, १९ डिसेंबर २०२४ रोजी नाशिक येथे मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय गुणीजन गौरव महासंमेलनात प्रा. रजनीताई लुंगसे यांना भारत ज्योती प्रतिभासन्मान एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

त्यांचे सामाजिक आणि शैक्षणिक कार्य लक्षात घेऊन मिळालेला हा त्यांचा १७ वा पुरस्कार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. कृष्णाजी जगदाळे यांनी केले होते, तर सेवानिवृत्त सी.जी. अधिकारी श्री. राजेंद्र गोसावी हे प्रमुख पाहुणे होते. सुप्रसिद्ध साहित्यिक श्री. रमेश आव्हाड यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.प्रा. रजनीताई लुंगसे यांनी अनेक समाज प्रबोधनात्मक पुस्तके लिहिली असून, त्या राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या परीट समाजाच्या एक महत्त्वपूर्ण सदस्या आहेत. त्यांना यापूर्वी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून आणि वैयक्तिकरित्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आणि समाजकार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!