पोलिसांचा संवेदनशील पुढाकार! शेतकऱ्यांच्या मदतीसाठी खाकीच्या वेतनातून २ लाख निधी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सुपूर्द
धुळे : मार्मिक न्यूज नेटवर्क: विक्की जाधव
अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना धुळे जिल्ह्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी केलेली संवेदनशील मदत कौतुकास्पद ठरली आहे. जिल्ह्यातील विविध पोलिसांनी आपल्या वेतनातून थोडीथोडी रक्कम जमा करून तब्बल दोन लाख रुपयांचा निधी उभारला.
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धुळे दौऱ्यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी हा निधी धनादेशाद्वारे मुख्यमंत्री सहायता निधी साठी हस्तांतरित केला. पोलीस दलाकडून दाखवलेला हा सामाजिक बांधिलकीचा आदर्श उपस्थित सर्वांना भावला. शेतकऱ्यांच्या संकट काळात प्रशासनाबरोबरच पोलीस दलही खंबीरपणे उभे असल्याचा संदेश या कृतीतून गेला. नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले असून, संकट काळात समाजातील प्रत्येक घटकाने अशा प्रकारे हातभार लावावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.