जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावण्याची चिन्हे दिसू लागली असून तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांचे नागरिकांना आव्हाहन.
अमळनेर : विक्की जाधव.
जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावण्याची चिन्हे दिसू लागली असून, हवामान खात्याच्या अंदाजानुसार शनिवार २७ सप्टेंबर सायं. ६.०० वाजेपासून सोमवार २९ सप्टेंबर सकाळी ६.०० वाजेपर्यंत विजांचा कडकडाट, मुसळधार सरी आणि ३०–४० किमी प्रतितास वेगाच्या वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, सुरक्षित स्थळीच थांबावे आणि विजांच्या धक्क्यांपासून सावधगिरी बाळगावी, असे आवाहन तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी अमळनेर तालुका वासीयांना केले आहे.

मुख्य इशाऱ्यात अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता अधोरेखित करण्यात आली असून, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी शेतात काम करताना विशेष काळजी घ्यावी, असे आवर्जून सांगण्यात आले आहे. झाडाखाली, वीजवाहक तारांच्या जवळ किंवा ओल्या जागी थांबणे टाळावे, तसेच पूरप्रवण भागात राहणाऱ्यांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही तहसीलदारांनी स्पष्ट केले.तज्ञांच्या मते, सोमवारी सकाळनंतर पावसाची तीव्रता कमी होऊन हलका ते मध्यम पाऊस राहील. मात्र, त्यापर्यंत मुसळधार सरींमुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सजग राहून प्रशासनास सहकार्य करावे, असा पुनश्च इशारा देण्यात आला आहे.