बाळंत कळा सोसण्याची तयारी सद्या तरी आपल्यात नाही, छत्रपती शिवाजी महाराज किंवा संत ज्ञानेश्वर जन्माला यावे तर बाजूच्या घरात पण माझ्या नको ही सद्याची मानसिकता योगेश सोमण यांचे विचारमंथन
अमळनेर : विक्की जाधव
मराठी वाङ्मय मंडळ, आप्पासाहेब रां. का. केले सार्वजनिक ग्रंथालय व मोफत वाचनालय, अमळनेर आयोजित शारदीय व्याख्यानमालेत प्रख्यात अभिनेते व विचारवंत योगेश सोमण कलाक्षेत्राचा समाजमनावर होणारा प्रभाव यावर बोलत होते. समाज, साहित्य आणि संस्कार यावर प्रभावी विचार त्यांनी मांडले.
“संत साहित्य किंवा इंग्रजी साहित्याने जसा समाजावर खोलवर परिणाम घडवला, तसा परिणाम आज आपण घडवण्यात कमी पडत आहोत,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
सोमण यांनी आपल्या अनुभवांवर प्रकाश टाकताना “छत्रपती शिवाजी महाराज किंवा संत ज्ञानेश्वर जन्माला यावे, पण माझ्या घरात नको” अशी मानसिकता समाजात रुजली आहे, याकडे लक्ष वेधले. व्यसनाधीनतेविषयी बोलताना त्यांनी स्वतःच्या जीवनातील किस्से सांगत पालकांच्या भूमिकेचे महत्व अधोरेखित केले.

“मी अडचणीत असताना माझी आईच माझी खरी पाठीराखी होती,” असे त्यांनी सांगत श्रोत्यांच्या डोळ्यात पाणी आणले.
वारकरी संप्रदायाचा अजरामर प्रभाव त्यांनी विशेषत्वाने अधोरेखित केला.
नाटक, लेखन व प्रयोगातून आपण समाजाला आरसा दाखवत असतो, असे मत मांडत त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाकडेही लक्ष वेधले. “आपल्या मुलांना मोबाईल आणि रील्सच्या नादात नकळत रसिकतेपासून दूर नेत आहोत,” असा इशारा देत त्यांनी पालकांना सजगतेचे आवाहन केले. यावेळी समस्त अमळनेरकर प्रेक्षक म्हणून उपस्थित होते.