अमळनेरमध्ये मुलानेच केला सख्ख्या बापाचा लोखंडी हातोडीने खून
अमळनेर : मार्मिक न्यूज नेटवर्क
शहरातील शिरूड नाका परिसरातील ३६ खोली भागात धक्कादायक घटना घडली असून, मुलानेच सख्ख्या बापाच्या डोक्यात लोखंडी हातोडीने मारून खून केला आहे. ही घटना ३१ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली. राजेंद्र दत्तात्रय रासने (वय ६५) हे रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत आढळून आले. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे, सपोनि सुनील लोखंडे यांच्यासह पथकाने घटनास्थळी पंचनामा केला. फॉरेन्सिक पथकाने नमुने जप्त केले असून, मृताच्या डोक्यात मारण्यासाठी वापरलेली लोखंडी हातोडी जप्त करण्यात आली आहे. दवाखान्यात नेल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राजेंद्र रासने यांना मृत घोषित केले.
सदर घटनेबाबत तपास करता, भूषण राजेंद्र रासने (वय ३६) या मुलानेच वडिलांच्या डोक्यात हातोडी मारून खून केल्याचे समोर आले. या प्रकरणी अमोल पाटील यांच्या फिर्यादीवरून भूषण रासने याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमळनेर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.