प्रताप महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात साजरा..
अमळनेर : विक्की जाधव.
खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमासाठी धुळे येथील प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी ‘मराठी साहित्याचे सामाजिक योगदान’ या विषयावर सखोल विवेचन करत साहित्यातील अनुभव, संस्कार आणि विचार समाजाला दिशा देतात, हे अधोरेखित केले.

आपल्या प्रभावी भाषणात डॉ. सूर्यवंशी यांनी साने गुरुजींचे कार्य, अमळनेरशी असलेले साहित्यिक संबंध, प्राचीन ते आधुनिक मराठी साहित्याचा प्रवास तसेच खानदेशातील स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान या बाबींवर विशेष प्रकाश टाकला. त्यांच्या विचारांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड आणि साहित्यविषयक कुतूहल जागृत झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य प्रा. एच.डी. जाधव यांनी “साहित्य हे मानवी जीवनाला दिशा देणारे माध्यम असून विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अभ्यासाबरोबर वाचन संस्कृती विकसित करणे अत्यावश्यक आहे” असे प्रतिपादन केले. या प्रसंगी मराठी विभाग प्रमुख प्रा. ज्ञानेश्वर कांबळे, डॉ. रमेश माने, प्रा. योगेश पाटील, डॉ. विलास गावीत, प्रा. तुषार पाटील, प्रा. सागर सैंदाणे, प्रा. गोपाल बडगुजर यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. कांबळे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. गोपाल बडगुजर यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. सागर सैंदाणे यांनी मानले. मराठी विभागातील सर्व प्राध्यापकांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.