अमळनेर तालुक्यात पावसाचा कहर – शेतकरी हवालदिल, वाहतुकीस अडथळा..
अमळनेर : विक्की जाधव
अमळनेर तालुक्यात काल झालेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी हाहाकार माजवला. गावांमधील घरांमध्ये पाणी शिरल्याने सामान्य नागरिकांचे मोठे हाल झाले तर शेतकऱ्यांचे पिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. विशेषतः अमळनेर – जळगाव रोडवरील सती माता मंदिराजवळील रेल्वे बोगद्याजवळ पाणी साचल्याने वाहतुकीची पूर्ण कोंडी झाली होती. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

दरम्यान, प्रशासनाकडून तातडीने मदत कार्य सुरू करण्यात आले. प्रांत अधिकारी नितीनकुमार मुंडावरे आणि तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी तातडीने आदेश देत मदत कार्य वेगाने राबवले. प्रभावित भागात बचाव कार्य सुरू करून नागरिकांना दिलासा देण्यात आला. नुकसानग्रस्त घरांची पाहणी करण्यात येत असून तत्काळ पंचनामे करून मदत मिळवून देण्यात येईल, असे प्रशासनाने जाहीर केले.

पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. कापूस, सोयाबीन, बाजरीसह हंगामी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अवकाळी पावसामुळे मोठे आर्थिक संकट ओढवले असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. “पिके पुन्हा उभी करायची कशी?” हा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे.

अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरातील अनेक वस्ती पाण्याखाली गेल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. पावसाचे पाणी निचऱ्याची व्यवस्था अपुरी ठरल्याने त्रास अधिक वाढला आहे. आता प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मदतीचा दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.