अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा..
अमळनेर : विक्की जाधव
अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या क्रीडा विभागातर्फे आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा. पराग पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. एच.डी. जाधव, प्रा. कल्पना पाटील, डॉ. योगेश तोरवणे, डॉ. डी.आर. चौधरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी सर्वप्रथम प्रतिमा पूजन व विविध खेळाडूंच्या स्टॅचूचे अनावरण करून क्रीडासंस्कारांना सलाम केला. यानंतर जुदो खेळाडूंनी आपल्या दमदार सादरीकरणाने उपस्थितांची दाद मिळवली.

कार्यक्रमात प्रा. जाधव यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे जीवनातील महत्त्व अधोरेखित करताना “क्रीडा म्हणजे केवळ शारीरिक ताकद नव्हे, तर शिस्त, आत्मविश्वास आणि जिद्द शिकवणारी शाळा आहे” असे सांगितले. डॉ. एस.बी. नेरकर यांनी आपल्या मनोगतातून क्रीडा दिनाचे ऐतिहासिक व सामाजिक महत्त्व पटवून दिले. यावेळी विद्यापीठ पातळीवर चमक दाखवणाऱ्या खेळाडूंचा ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. तसेच बॅडमिंटन, बुद्धिबळ आणि मास रेसलिंग अशा विविध स्पर्धा रंगल्या. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन क्रीडा संचालक डॉ. सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. जुदो प्रशिक्षक सचिन वाघ आणि प्रशांत देवकते यांनी सहकार्य केले. डॉ. अवीत पाटील यांनी नेत्रदीपक सूत्रसंचालन केले तर आभारप्रदर्शन डॉ. सचिन पाटील यांनी केले. कनिष्ठ व वरिष्ठ क्रीडा विभागातील सर्व खेळाडूंनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत राष्ट्रीय क्रीडा दिन संस्मरणीय करून टाकला.