श्री मंगळ ग्रह देवाच्या जन्मोत्सवाचा तीन दिवसीय महासोहळा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट व नेते आमदार एकनाथराव खडसेयांची उपस्थिती..
अमळनेर : विक्की जाधव
अमळनेरमध्ये श्री मंगळ ग्रह देवाच्या जन्मोत्सवाचा तीन दिवसीय महासोहळा भक्तीच्या उत्साहात सुरू झाला आहे. भाद्रपद शुद्ध दशमीच्या मुहूर्तावर मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे आयोजित या पर्वाची सुरूवात २९ ऑगस्ट रोजी भव्य महाभोमयागाने झाली. या सोहळ्यात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी सपत्नीक उपस्थित राहून श्री मंगळग्रह देवाचे दर्शन घेतले. विशेष म्हणजे, यंदाचे २०२५ हे वर्ष मंगळग्रहाच्या प्रभावाचे असून, आगामी २ सप्टेंबर रोजी येणारा मंगळवारी जन्मोत्सव महामंगल योग मानला जात आहे.

लंडन, नाशिक, पिंपळगाव, अमळनेर अशा विविध ठिकाणांहून यजमान उपस्थित राहून सपत्नीक महाभोमयाग केला. मंदिरातील पुरोहित वर्गाने मंत्रोच्चार व विधींनी वातावरण पवित्र केले. संध्याकाळी महाआरतीनंतर भाविकांच्या उपस्थितीत सोहळ्याची सांगता झाली. श्री मंगळग्रह देवाच्या मंदिरात यावेळी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.

या प्रसंगी मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, “अनेक वर्षांपासून या मंदिराला येण्याची इच्छा होती. आज ती पूर्ण झाली. एकेकाळी निर्जन असलेल्या या ठिकाणी आज जगभरातील भाविक आकर्षिले जातात, हे देवाच्या कृपेचेच फलित आहे.” तर ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनीही आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “२७ वर्षांनंतर महामंगल प्रसंगी दर्शनाचा योग आला, हे माझे भाग्य आहे. मंदिराचे व्यवस्थापन, स्वच्छता आणि भक्तिमय वातावरणामुळे याची महती जगभर पसरली आहे.” मंगळग्रह सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मान्यवरांचा सत्कार करून त्यांचे स्वागत केले. आगामी ३१ ऑगस्ट व २ सप्टेंबरला होणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी भाविकांमध्ये उत्सुकता असून, श्री मंगळग्रह मंदिर परिसर भक्तीमय वातावरणाने उजळून निघाला आहे.