“क्रीडा विभागाच्या तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या मुलींचा संघ विजयी होत जिल्हा स्तरावर निवड”
अमळनेर: विक्की जाधव.
येथे आज दिनांक 25 ऑगस्ट रोजी तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण विभाग, पंचायत समिती अंमळनेर, आणि तालुका क्रीडा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या व्हॉलीबॉल स्पर्धेत ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या अंडर 14 वयोगटातील विद्यार्थिनींच्या संघाने प्रतिस्पर्धी डी.आर. कन्या शाळा अमळनेर संघाला चित करूत स्पर्धेचे तालुका विजेतेपद पटकावत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान मिळवले. मुलींच्या या विजयामुळे ॲड .ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या शिरपेचात पुन्हा एकदा विजयाचा तुरा रोवला गेला आहे.

या स्पर्धेत विजयी संघाच्या विद्यार्थिनींचे “आमच्या या मुली आमचा अभिमान असून त्यांनी भविष्यात अशीच उत्तुंग भरारी घ्यावी” असे म्हणत जिजाऊ बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा ॲड .ललिता पाटील यांनी कौतुकाची थाप मारली व प्राचार्य डॉ. नीरज चव्हाण यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले आहे. सदरील स्पर्धा या ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या पटांगणात आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचे उद्घाटन प्रताप महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. अग्रवाल सर यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष श्री एस.पी.वाघ, शाळेचे क्रीडा आणि तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक उपस्थित होते .या स्पर्धेतील विजयी विद्यार्थिनींना प्रशिक्षित करण्यासाठी शाळेचे क्रीडा शिक्षक श्री केदार देशमुख, श्री सागर चावरिया,श्री रमेश धनगर आणि श्रीमती ममता पाटील यांनी अपार कष्ट घेतले. शाळेतील सर्व शिक्षकांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले असून सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.