‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा
मार्मिक न्यूज नेटवर्क : मुंबई
ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत असलेल्या अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईचे परिपत्रक जारी केले आहे, ज्यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा अनुचित लाभ घेतला आहे. महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार अशा लाभार्थी कर्मचाऱ्यांवर आवश्यक ती कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश विभागाकडून देण्यात आले आहेत.
शासनाने महिलांसाठी सुरू केलेली ही योजना गरजू आणि पात्र लाभार्थ्यांसाठी असताना, काही ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या नावावर अर्ज दाखल करून लाभ घेतल्याचे समोर आले होते. यामुळे प्रामाणिक लाभार्थ्यांना न्याय मिळण्यात अडथळे निर्माण होत असल्याची तक्रार वाढली होती.
या पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाने कडक पवित्रा घेत कारवाईचे आदेश दिले आहेत. अशा कर्मचाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कठोर शिस्तभंगात्मक कारवाई करण्यात येणार असून, शासनाच्या योजनांमध्ये फसवणूक करणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही, असा इशाराही यामधून देण्यात आला आहे.