अवैध पार्किंग व वाहतूक समस्यांवर उपाययोजनांसाठी बारामतीत महत्त्वपूर्ण बैठक
बारामती/प्रतिनिधी – वर्षा चव्हाण
अखिल भारतीय ग्राहक पंचायत बारामती व तालुका प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती शहर, एमआयडीसी आणि तालुक्यातील वाढत्या वाहतूक समस्यांबाबत महत्त्वपूर्ण बैठक आज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात पार पडली. या बैठकीत विशेषतः विमानतळ ते पेन्सिल चौक या मार्गावरील अवजड कंटेनर व ट्रकच्या अवैध पार्किंगसंदर्भातील समस्यांवर उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला.
ग्राहक पंचायतने यासंदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना वेळोवेळी पाठपुरावा केला होता. या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत ट्रक यार्डमध्ये चालकांसाठी आवश्यक त्या सर्व मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटर वाहन कायद्यानुसार आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने कठोर कारवाई करण्यात येईल, असे ठाम निर्देश देण्यात आले.
तसेच कंपनीतील कामगारांना वाहन शिस्त, पार्किंग आणि सुरक्षित वाहतुकीबाबत योग्य मार्गदर्शन देण्याचेही ठरवण्यात आले.
या बैठकीस अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर (दूरदर्शीप्रणालीद्वारे), उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम, म.औ.वि. महामंडळाचे अधिकारी हनुमंत पाटील, वाहतूक निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक श्रीमती वैशाली पाटील, तसेच नायब तहसीलदार श्रीमती पी.डी. शिंदे उपस्थित होते.
या बैठकीनंतर अखिल भारतीय ग्राहक पंचायत बारामती तालुक्याची मासिक बैठकही पुणे जिल्हाध्यक्ष ॲड. तुषार झेंडे पाटील व सहसंघटक दिलावर तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर पार पडली. या वेळी तालुका अध्यक्ष संजीव बोराटे, उपाध्यक्ष प्रशांत जगताप, सचिव महेश पवार, सहकोषाध्यक्ष सचिन चौधर यांच्यासह बाळासाहेब शिंदे, चेतन मोहिते, बाळासाहेब ननवरे, विकास लोहार, नागेश देशमाने, प्रशांत मोहिते, प्रमोद मोरे, निखिल नाटकर, अजय पिसाळ, आदी सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत ॲड. तुषार झेंडे पाटील यांनी तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून आवश्यक त्या उपाययोजना आणि पुढील कार्ययोजनांबाबत मार्गदर्शन केले.
ही बैठक वाहतूक व्यवस्थापन आणि नागरी समस्यांवर ठोस उपाय काढण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे.