बारामती नगरपरिषदेच्या निवडणूकांची घोषणा: नऊ वर्षांनंतर पुन्हा लोकशाहीचा उत्सव, नगराध्यक्षपदावर सस्पेन्स कायम

अपनी भाषा में पढ़े! Translate

बारामती नगरपरिषदेच्या निवडणूकांची घोषणा: नऊ वर्षांनंतर पुन्हा लोकशाहीचा उत्सव, नगराध्यक्षपदावर सस्पेन्स कायम

बारामती │ प्रतिनिधी – वर्षा चव्हाण

नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकले गेले आहे. सोमवारी (दि. 18 ऑगस्ट) नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी अधिकृत प्रभागरचना जाहीर केली. यावर 31 ऑगस्टपर्यंत हरकती व सूचना नोंदविण्याची मुदत देण्यात आली आहे.

गेल्या निवडणुका 14 डिसेंबर 2016 रोजी पार पडल्या होत्या. परंतु, त्या नगरपरिषदेची मुदत 18 फेब्रुवारी 2022 रोजी संपल्यानंतर तीन वर्षांहून अधिक काळ प्रशासकांच्या अधिपत्याखाली नगरपरिषद कार्यरत होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाने प्रक्रिया हाती घेतली असून, त्यामुळे बारामतीमध्ये पुन्हा लोकशाहीचा उत्सव साजरा होणार आहे.

बारामती नगरपरिषदेच्या नव्या रचनेनुसार 20 प्रभागातून एकूण 41 नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. यामध्ये 19 प्रभागांमधून प्रत्येकी दोन नगरसेवक आणि एका प्रभागातून तीन नगरसेवक निवडले जाणार आहेत. विशेष म्हणजे, यावेळी 50 टक्के जागा महिलांसाठी आरक्षित असणार आहेत, त्यामुळे महिलांचा प्रतिनिधित्व वाढणार आहे.

पुणे जिल्ह्यातील बारामती ही एकमेव ‘अ’ वर्गातील नगरपरिषद असून, सर्वाधिक नगरसेवक संख्या असलेली म्हणून तिची वेगळी ओळख आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

प्रभागरचना जाहीर होताच इच्छुकांनी आपापल्या गणितांचा अंदाज बांधायला सुरुवात केली असून, कुठल्या प्रभागातून निवडणुकीच्या रिंगणात उतरावे यावर मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. पर्यायी प्रभागांचा विचारही अनेकांनी सुरु केला आहे.

दरम्यान, नगराध्यक्षपदाचे आरक्षण अद्याप निश्चित झालेले नाही, त्यामुळे या पदावर कोण दावा सांगणार याचा सस्पेन्स कायम आहे. निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार 26 ते 30 सप्टेंबर दरम्यान अंतिम प्रभागरचना जाहीर होईल. त्यामुळे दिवाळीनंतरच निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बारामतीत पुन्हा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून कारभार सुरु होणार असल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आगामी काळात राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!