अमळनेरमध्ये महसूल दिन व महसूल सप्ताह २०२५ साजरा होणार
अमळनेर : विक्की जाधव
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व नोंदणी विभागाच्या आदेशानुसार १ ऑगस्ट २०२५ रोजी “महसूल दिन” व १ ते ७ ऑगस्ट दरम्यान “महसूल सप्ताह २०२५” राज्यभर साजरा करण्यात येणार आहे. त्यानुसार अमळनेर तालुक्यातही विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, महसूल प्रशासन सज्ज झाले आहे. या सप्ताहात महसूल विभागाच्या विविध सेवा नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासह, महसूल कर्मचाऱ्यांचा सत्कार, जमीन अभिलेख अद्ययावत करणे, अतिक्रमण हटवणे, लाभार्थ्यांना शासकीय योजनांचे लाभ वाटप, वृक्षारोपण, DBT प्रणाली सुलभ करणे, तसेच माहिती व जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

१ ऑगस्ट रोजी महसूल विभागातील उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार व प्रमाणपत्र वितरण सोहळा होणार असून, २ ऑगस्टला २०११ पूर्वीच्या शासकीय जमिनीवरील अतिक्रमण प्रकरणांमध्ये पात्र लाभार्थ्यांना पट्टे वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतरच्या दिवसांत पाणंद रस्त्यांचे अतिक्रमण हटवणे, वृक्ष लागवड, शिवराज्याभिषेक अभियान, DBT घरभेटी, शासकीय जमिनीवरील शर्तीभंगावरील कार्यवाही आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
महसूल सप्ताहात शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रसारमाध्यमे, सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकांचा सहभाग महत्वाचा ठरणार आहे. महसूल विभागाच्या उपक्रमांत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन तहसीलदार कार्यालय अमळनेर यांच्यातर्फे करण्यात आले आहे.