आ. अनिल पाटील यांच्या वाढदिवसाचा भव्य समारंभ; शेतकऱ्यांना बैल साज व मापाडींना लॉकर वाटप
अमळनेर : विक्की जाधव
कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने माजी मंत्री आ. अनिल भाईदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित समारंभात हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बैलजोडी धारक शेतकऱ्यांना पोळा सणासाठी बैल साज तसेच मापाडींना लॉकर किल्ल्यांचे वाटप करण्यात आले. आ. पाटील यांची सपत्नीक मिरवणूक ढोलताशांच्या गजरात काढण्यात आली तर त्यांची शैक्षणिक साहित्य तुलाही करण्यात आली. आ. पाटील यांनी आपल्या भाषणात मतदारसंघ बागायती होईपर्यंत शेतकऱ्यांची साथ न सोडण्याचे आश्वासन दिले. शेतकऱ्यांनी पोळा पारंपरिक पद्धतीने साजरा करत कृषी क्षेत्रात आधुनिकतेकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले. बाजार समितीच्या वतीने ३००० शेतकऱ्यांना सजावटी साहित्य असलेली बैल साज बॅग घरपोच देण्यात येणार आहे.
कार्यक्रमात सभापती अशोक पाटील, खा. स्मिता वाघ, सौ. जयश्री पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. राज्यातील पहिल्यांदाच मापाडींना वैयक्तिक लॉकर सुविधा देणारी ही बाजार समिती ठरली आहे. यावेळी विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, बाजार समिती संचालक मंडळ आणि मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.