बोगस शिक्षक भरती घोटाळा: नाशिक व जळगावमधील अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल
मार्मिक न्यूज नेटवर्क : विक्की जाधव
जळगाव जिल्ह्यातील १० शिक्षण संस्थांमध्ये शिक्षकांची बोगस भरती झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात ४९ बोगस शिक्षकांना शालार्थ आयडी देऊन शासन तिजोरीतून दरमहा ५० हजार रुपये वेतन देण्यात आले. या घोटाळ्याच्या उघडकीनंतर नाशिक शिक्षण उपसंचालक कार्यालयातील लेखाधिकारी उदय पंचभाई आणि जळगाव माध्यमिक वेतन पथकाचे अधीक्षक राजमोहन शर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामकृष्ण अभिमन पाटील यांची तक्रार
या प्रकरणी रामकृष्ण अभिमन पाटील यांनी तक्रार दाखल केली होती, त्यानंतर शिक्षण आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले. चौकशीत तक्रारीतील माहिती खरी असल्याचे स्पष्ट झाल्यावर नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
संगनमतातून मोठी फसवणूक
प्राथमिक चौकशीनुसार, लेखाधिकारी उदय पंचभाई आणि अधीक्षक राजमोहन शर्मा यांनी पदाधिकारी व मुख्याध्यापकांसोबत संगनमत करून शिक्षकांची बोगस भरती केली. शासनाकडून वेतन मंजूर करून घेत शिक्षण क्षेत्रात मोठी फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह
या घोटाळ्यामुळे शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दोषींवर कडक कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हा प्रकार शिक्षण क्षेत्रातील जबाबदार अधिकाऱ्यांसाठी धोक्याची घंटा ठरू शकतो, ज्यामुळे भविष्यात अशा गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.
अमळनेर तालुक्यातील देखील काही दलाल
या सह अमळनेर तालुक्यातील ही काही दलाल अश्या प्रकारची दलाली करताहेत असे समोर आले आहे. मार्मिक च्या प्राथमिक माहितीनुसार असे स्पस्ट होते की अमळनेर पोलीस स्टेशनं ला देखील अश्या प्रकारचा गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज प्राप्त झाला असून कोटी रुपयाचा घोटाळा लवकरच पुढे येईल यात शहरातील तांबेपुरा आणि ग्रामीण परिसरातील दोन शाळांचा समावेश आहे.
क्रमश :