औषध निरीक्षक आणि खाजगी व्यक्ती लाच स्वीकारताना रंगेहात पकडले..
धुळे: धुळे जिल्ह्यात लाचखोरीच्या आणखी एका धक्कादायक प्रकरणाची माहिती समोर आली आहे. शिरपूरमध्ये पशुपक्षी फार्म सुरू करण्यासाठी परवान्यासाठी अर्ज करणाऱ्या तक्रारदाराकडून ८,००० रुपयांची लाच मागितल्याचा आरोप औषध निरीक्षक किशोर देशमुख आणि खाजगी इसम तुषार जैन यांच्यावर करण्यात आला आहे.
तक्रारदाराने २५ फेब्रुवारी २०२५ रोजी अन्न व औषध प्रशासन विभाग, धुळे येथे ऑनलाईन अर्ज सादर केला. त्यानंतर त्यांनी औषध निरीक्षक किशोर देशमुख यांची भेट घेतली, ज्या वेळी त्यांना शिरपूर येथील मेडिकल दुकानदार तुषार जैन यांच्या सोबत ४ मार्च रोजी स्थळ निरीक्षण करण्याची माहिती देण्यात आली. निरीक्षणाच्या वेळी औषध निरीक्षक किशोर देशमुख आणि तुषार जैन यांनी तक्रारदाराकडून ८,००० रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराने धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीची चौकशी करण्यात आल्यावर पारोळा चौफुली येथे सापळा रचण्यात आला. आजच्या कारवाईत खाजगी व्यक्ती तुषार जैन लाच स्वीकारताना रंगेहात पकडले गेले, तसेच औषध निरीक्षक किशोर देशमुख यांनाही अन्न व औषध प्रशासन कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पोलीस निरीक्षक पंकज शिंदे तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, प्रविण मोरे, संतोष पावरा, प्रशांत बागुल, रामदास बारेला, मकरंद पाटील, प्रविण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असुन गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.