कोशिश करनेवालों की हार नहीं होती – आयपीएस मोक्षदा पाटील यांचे प्रतिपादन..
अमळनेर : विक्की जाधव.
खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर येथे अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्ष (IQAC) आणि राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (RUSA) यांच्यासमवेत करियर कौन्सिलिंग सेंटर (CCMC) च्या सहयोगाने आयोजित केलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कोर्सच्या निमित्ताने आयपीएस अधिकारी मोक्षदा पाटील यांनी “नागरी सेवेतील परीक्षेत माझा प्रवास” विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात 500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी उत्साहाने सक्रिय सहभाग घेतला. आयपीएस मोक्षदा पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितले की, “ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांनी भाषा आणि विविध अडचणींची काळजी न करता परिश्रमपूर्वक अभ्यास करावा.” त्यांनी स्वअनुभव कथन करून विद्यार्थ्यांना प्रेरित केले की, “शारीरिक व्यायाम आणि नियमित अभ्यास करणे आवश्यक आहे. आत्मविश्वास, दृढ निश्चय, नियोजन आणि तयारी हे मूलभूत घटक आहेत.” त्यांनी स्पष्ट केले की, “स्पर्धा परीक्षा एक चक्रव्यूह आहे, त्याला भेदण्यासाठी पूर्ण तयारी आवश्यक आहे. कोणतेही शॉर्टकट नाहीत. समाज माध्यमांचा योग्य उपयोग करून योग्य माहिती मिळवा.”याप्रसंगी, अनेकार्थाने विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रश्नांना विचारण्यात मोठा जोश दाखवला. यामध्ये गायत्री पाटील, आदित्य पाटील, जानव्ही जोशी आणि महाराष्ट्र टाइम्सचे पत्रकार मिलिंद पाटील यांच्यासह अन्य मान्यवरांने चर्चेत सहभाग घेतला तर यावेळी मार्मिक समाचार चे पत्रकार विक्की जाधव देखील उपस्थिती होते.
कार्यक्रमात खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. संदेश गुजराथी, उपाध्यक्ष सीए नीरज अग्रवाल, तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले आणि त्यांचे विचार व अनुभव शेअर केले. आयपीएस मोक्षदा पाटील यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात म्हटले, “कोशिश करनेवालों की हार नहीं होती,” या उक्तीने विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवन पाटील सरांनी केले, आणि प्रा. विजय साळुंखे यांनी आभार मानले. उपस्थित विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण करून, त्यांना त्यांच्या यशाचा सन्मान करण्यात आला, तसेच राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम स्थान मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानही करण्यात आला.
हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये मार्गदर्शक ठरला असून, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा प्रदान करणारा आहे.