शिंदेंचे पंख छाटले जात आहेत
एकनाथ शिंदेना भाजपाचा पेंद्या करून टाकले !
मामु एकनाथ शिंदे यांची गरज भाजपा पुरती संपली आहे. त्यामुळे आत्ता आपला आश्रीतच आपल्या वरचढ होऊ नये, याची दक्षता भाजप व विशेष करून देवेंद्र फडणवीस हे घेताना दिसत आहेत. अवघे ५७ आमदार निवडून आलेले असताना एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदासाठी वापरलेले दबाव तंत्र व नाराजी नाट्य भाजपाला मुळीच रूचलेले नाही. हा माणूस किती घातकी आहे, हे उद्धव ठाकरेंशी केलेल्या विश्वासघातामुळे भाजपला चांगलेच ठाऊक झाले आहे. उद्या हा माणूस आपला स्वतंत्र गट तयार करून दबाव तंत्राचा वापर करू शकतो. भविष्यात तो घातक ठरण्याचा धोका भाजपाचे गृहमंत्री अमित शहा यांनी ओळखला आहे.
एकनाथ शिंदे यांची राजकिय पार्श्वभूमी पाहता ते १९८२ दरम्यान शिवसेनेच्या विभाग शाखेचे शिवसैनिक झाले.
त्यावेळी त्यांचे वय १८ वर्षे असेल. त्यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यानुसार ते शिवसेनेच्या शाखेत जाण्यापुर्वी संघाच्या शाखेत जात होते. ही सपशेल फेकुगिरी आहे आणि मोदी शहांच्या फेकुगिरीचा गुण नाही तर वाण लागला, असे म्हणावे लागेल. शिंदे जर संघाच्या शाखेत गेले असते तर त्यांचे आदर्श गोळवलकर गुरूजी असायला हवे होते आणि ते तर ढिंडोरा पिटत आहेत की धर्मवीर आनंद दिघे माझे गुरू व आदर्श आणि मी त्यांचा पट्टशिष्य !
हे मुद्दाम नमुद करण्याचे कारण हा माणूस अतिशय थापेबाज आहे. धर्मवीर पार्ट-१ अथवा पार्ट- २ मधे त्यांचा संघा बाबतचा ओझरता का होईना उल्लेख का नसावा ? तसेच दिघे साहेबांच्या सिंघानियातील निधना नंतर या पठ्ठ्याने दिघे साहेबांचे पार्थिव स्वत:च्या खांद्यावरून आणले, ही तर न पचणारी लोणकढी थाप आहे. असे अनेक प्रसंग सांगता येतील परंतू तूर्तास हे दोनच प्रसंग पुरेत ! धर्मवीर आनंद दिघेंच्या अकाली मृत्यूचे खरे”लाभार्थी” ठरलेले शिंदे त्यांचा आनंद आश्रम बळकावतात, त्यांची दर्शनी भागावरील ओळखही मिटवू पाहतात, टप-यांवर लाववेले दिघे साहेबांचे फोटो हटवून स्वत:चे फोटो लावतात,इतकेच नव्हे तर आनंद आश्रमावर “महाराष्ट्राचे भाग्य विधाते” हा बॅनर लावून दिघे साहेबांचे शिष्यपौर्णिमेचे भीत्तीचित्र झाकून टाकतात,
त्या एकनाथ शिंदेंवर कोण विश्वास ठेवेल व कोण जवळ करेल ?
त्यामुळेच भारतीय जनता पक्षाने शिंदें बाबत सुरूवाती पासूनच सावधानतेची भूमिका घेतली.शिवसेनेस कमजोर करण्यासाठी कपटी भाजपाने कपटनीतीचा शिंदेचा कु-हाडीच्या दांड्यासारखा कुशलतेने वापर केला. त्यांची “इडीची पीडा” टाळण्याचे गाजर दाखवून शिवसेना फोडण्यासाठी प्रवृत्त केले. त्यासाठी खोक्यांचे पेटारे मोकळे केले. इतके करूनही हा माणूस फुटू नये म्हणून ४० पळपुट्या आमदारांच्या म्होरक्यास मुख्यमंत्री पदावर बसवले. एक प्रकारे बेईमानीेेचे “इनामच” बहाल केले. “गद्दार हा गद्दारच असतो तो कधीही कोणाशी प्रामाणिक राहू शकत नाही”, हे गद्दारांचे ठोक व्यापारी शहांनी ओळखले होते. त्यासाठीच भाजपचे मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या मर्जी विरूद्ध उपमुख्यमंत्री पद स्विकारायला भाग पाडले. एक वेळ अशी होती की, हेच देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदाची असंवैधानिक पद म्हणून हेटाळणी करायचे. ते उपमुख्यमंत्री पद स्विकारायला तयार झाले, कारण शहांनी त्यांना कानमंत्र दिला असावा की, ४० आमदारांच्या म्होरक्याला मुख्यमंत्री पद देत आहोत, कारण याच सूर्याजी पिसाळाच्या खांद्यावर बंदुक ठेऊन आपल्याला महाराष्ट्र व प्रामुख्याने मुंबई वर वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे. याला जरी मुख्यमंत्री केलं तरी सर्व सूत्रं तुमच्याच हातात असतील, तुम्ही त्याच्यावर अंकुश ठेवायचा आहे, मुख्यमंत्रीपदाच्या गळ्यातील लोढणं बनून याची चाल रोखायची. एकदा आपले इप्सित साध्य झाले की, अडिच वर्षांनंतर तुम्हीच मुख्यमंत्री व्हाल !
घडलेही तसेच. भाजपला महाराष्ट्रात सत्ता काबिज करण्यासाठी शिंदेंचा खांदा तर वापरायचा होता परंतू हे जोखड भिरकावून द्यायचे होते. युती असल्याने सत्ता येण्यासाठी भाजपने जे तंत्र अवलंबले त्यात प्रत्येक मतदार संघातील किमान १० हजार नावं जे विरोधकांचे मतदार आहेत ते वगळून इतरत्रचे आपल्यास अनुकूल असे १० हजार मतदार सामिल करणे असेल किंवा EVM च्या माध्यमातून केलेले “मतपरिवर्तन” याचा लाभ भाजपा प्रमाणेच मित्र पक्ष असलेल्या शिंदे सेनेस व अजित पवारांच्या राष्ट्रवादीसही झाल्याने शिंदेंच्या सेनेस ५७ तर राष्ट्रवादीस ४१ जागी अनपेक्षित यश मिळाले. अन्यथा शिंदे सेना २० व पवारांच्या राष्ट्रवादीस १० जागा मिळणेही अशक्य होते.
अपेक्षित सत्ता मिळताच भाजपने आपले खरे रूप प्रगट केले. “हम करे सो कायदा” ची
घोषणाच करून टाकली.” गेल्या वेळी आम्ही मुख्यमंत्री पद देऊन तुमच्यावर उपकार केले आहेत, आत्ता जे पदरी पडेल ते मुकाट्याने गुपगुमान घ्या,नाही तर तुमच्या शिवाय अजित पवारांना सोबत घेऊन बहुमताचे सरकार स्थापन करू शकतो.” कारण अजित पवारांनी आधीच लोटांगण घालून उपमुख्यमंत्री पदासाठी होकार दिला होता.त्या बाबत ते मुरब्बी ठरले. तरी मामु शिंदेंनी आजारी पडण्याचे, गावी जाऊन रूसून बसण्याचे नाराजी नाट्य वठवले.अखेर आपण सत्तेत राहिलो तरच आपल्या सोबत आमदार राहतील अन्यथा ते आपल्या सारखेच १/३ संख्येने बाहेर पडले तर आपली गत-घरका ना घाटका होईल, शिंदे समर्थकांनी हा धोका लक्षात आणून देताच, एकनाथरावांचे डोळे खाड्कन उघडले असावेत. मग मला गृहमंत्री पद द्या, असा “राजकिय बालहट्ट” धरला.भाजपा काही दुधखुळा नव्हता की इतके मोठे व महत्वाचे खाते एका फितुर वृत्तीच्या नेत्यास देईल. भाजपाने त्यांची नगर विकास खाते देऊन बोळवण केली. भाजपाने शिंदे नावाच्या एका लढाऊ माजी शिवसैनिकाची अवस्था “पेंद्यासारखी” करून टाकली. भाजपाच्या तालावर नाचायला व टाळया पिटाण्यापुरतेच ठेवले. इतकेच नव्हे तर स्वीय सचिव ( collector) व स्टाफ कोणता नेमायचा ? याचा अधिकारही काढून घेऊन तो फडणवीसांनी स्वत:कडे ठेऊन यांना निष्प्रभ करून टाकले.
भाजपची अजून एक मोठी खेळी शिल्लक आहे. ठाणे जिल्ह्यातील एकनाथ शिंदे यांच्या वर्चस्वावर निर्बंध घालण्यासाठी एकनाथ शिंदेंचे पुर्वपार विरोधक गणेश नाईक यांना देखील मंत्री मंडळात सामिल करून घेतले आहे. अतृप्त एकनाथ शिंदे यांना आत्ता आपले वर्चस्व टिकवण्यासाठी ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचे डोहाळे लागले आहेत.
भाजपा एकनाथ शिंदेंची ही अखेरची इच्छा पुर्ण होऊ देईल ? असे मला तरी वाटत नाही. कारण गणेश नाईक हे एकनाथ शिंदे “बच्चा” असल्यापासून (१९७१) ठाणे जिल्हा शिवसनेचे नेतृत्व करीत होते. १९९० साली ते प्रथम आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी १९९९ साली ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद भुषवले होते तेव्हा एकनाथ शिंदे हे साधे नवखे नगरसेवक होते. ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्रीपदी मिळत नसेल तर अधिक अवहेलना करून घेण्यापेक्षा संत तुकाराम महाराज म्हणतात तसे “भिक्षापात्र अवलंबिणे, जळो जिणे लाजीरवाणे !” असे म्हणत एकनाथ शिंदेंनी राजकिय संन्यास घेऊन वानप्रस्थाश्रम स्विकारावा व दरे गावात रममाण व्हावे !
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार
९८२२ ९० २४७०