प्रा. डॉ. रमेश माने यांच्या ग्रंथाला राज्यस्तरीय शब्दशिल्प वाङ्मय पुरस्कार
अमळनेर : विक्की जाधव
प्रताप महाविद्यालयाच्या मराठी विभागातील प्रा. डॉ. रमेश माने यांनी मराठीतील प्रसिद्ध कवी संजय चौधरी यांच्या कवितेवर संपादित केलेल्या व मुंबईच्या ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘संजय चौधरींच्या कवितेचा कोलाज’ या संपादित काव्यसमीक्षा ग्रंथाला शब्दशिल्प वाङ्मय प्रतिष्ठान, कराड (जि. सातारा) च्या वतीने उत्कृष्ट संपादनासाठी देण्यात येणारा राज्यस्तरीय शब्दशिल्प वाङ्मय पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. पुरस्काराची घोषणा मुख्य संयोजक प्रा. डॉ. सुहासकुमार बोबडे यांनी एका पत्राद्वारे केली आहे. शॉल, श्रीफळ, मानपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. लवकरच त्यांना शब्दशिल्प वाङ्मय प्रतिष्ठान, कराडच्या वतीने सन्मानित करण्यात येणार आहे.
प्रा. डॉ. रमेश माने यांना यापूर्वी ‘संजय चौधरींच्या कवितेचा कोलाज’ या संपादित काव्यसमीक्षा ग्रंथाला धाराशिव येथील युगप्रवर्तक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार व नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोलीच्या वतीने उत्कृष्ट संपादनाचा राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय पुरस्कार असे दोन पुरस्कार लाभले आहेत. तर प्रस्तुत पुस्तकाला शब्दशिल्प हा तिसरा राज्यस्तरीय पुरस्कार लाभला आहे.
प्रा. डॉ. रमेश माने यांनी ‘निवडक दहा कथा : आशय आणि स्वरूप’, म. सु. पगारे लिखित बा, तथागता : मानवतावादी सौंदर्यशास्त्र’, संजय चौधरींच्या कवितेचा कोलाज’ इत्यादी ग्रंथांचे संपादन केले आहे. तसेच गेल्या वर्षी अमळनेर येथे संपन्न झालेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेचे संपादन केले आहे. शिवाय यापूर्वी त्यांनी पुणे येथून प्रकाशित होणाऱ्या ‘अक्षरपेरणी’ या नियतकालिकेचे काही काळ सहसंपादक म्हणून काम पाहिले आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने त्यांचे खान्देश शिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. जैन, सहचिटणीस डॉ. धीरज वैष्णव, उपप्राचार्य प्रा. पराग पाटील, डॉ. कल्पना पाटील, डॉ. विजय तुंटे, डॉ. अमित पाटील, डॉ. विजय मांटे, डॉ. योगेश तोरवणे, आयक्यूएसी समन्वयक डॉ. मुकेश भोळे, कुलसचिव राकेश निळे, कार्यालयीन अधीक्षक देवेंद्र कांबळे, भटू चौधरी, यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर बंधू-भगिनींसह साहित्य, शिक्षण व विविध क्षेत्रातून सर्वत्र अभिनंदन होत आहे.