अमळनेरची यशाची परंपरा कायम राखत डॉ. अमोघ जोशी यांना “राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार” जाहीर
अमळनेर : विक्की जाधव
अमळनेरच्या गौरवशाली परंपरेला झळाळी देत, डॉ. अमोघ जोशी यांना यावर्षीचा “राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२४” जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या टॅलेंट कट्टा संस्थेच्या वतीने ह्या पुरस्काराचा बहुमान त्यांना मिळाला आहे.
विशेष म्हणजे, डॉ. अमोघ जोशी हे अमळनेरचे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ. डॉ. अविनाश जोशी यांचे सुपुत्र आहेत आणि त्यांनी वैद्यकीय व संगीत क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी हा मान प्राप्त केला आहे. पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, मानचिन्ह, शाल आणि फेटाअसून या पुरस्कार वितरण सोहळ्यात साहित्य, कला, सामाजिक कार्य, क्रिडा, सांस्कृतिक, उद्योग, पर्यटन, अपंग, निराधार महिला, वन्यजीव, व्यवसाय, शैक्षणिक, आरोग्य, सार्वजनिक सेवा, स्वायत्त संस्था, सहकार, पत्रकारिता, कृषी इत्यादी क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा समावेश करण्यात आला होता. डॉ. अमोघ जोशी यांना हा पुरस्कार मिळाल्याने अमळनेरच्या यशाची परंपरा त्यांनी कायम ठेवली असे स्पष्ट होते, आणि त्यांच्या कामगिरीमुळे युवा पिढीसाठी एक प्रेरणा मिळेल. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.