अनिल थत्तेंचा खळबळजनक गौप्यस्फोट : संजय राऊत यांची हत्या होऊ शकते !
https://youtu.be/TG_5qK1Iz_U?si=pt250RdEtBiM-8LJ
नुकतेच शिवसेनेचे राज्य सभेचे खासदार, नेते, प्रवक्ते व दै सामनाचे संपादक संजय राऊत यांच्या निवासस्थानाची रेकी दोन बाईकस्वारांनी केल्याचे व मोबाईलवर छायाचित्रंही काढल्याच्या वृत्ताने एकच खळबळ माजली आहे. संजय राऊत हे शिवसेनेचे फायरब्रॅन्ड नेते असून उद्धव ठाकरे व त्यांच्या शिवसेनेशी एकनिष्ठ आहेत.त्यांनी भाजपाच्या दबावतंत्रास झुगारले, आमिषं लाथाडली म्हणून त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून १०३ दिवस कारागृहात डांबले. अनेक दिग्गज व स्वत:ला एकनिष्ठ म्हणवणारे ( उदा.रविंद्र वायकर, निलम गोरे ) नेते व पदाधिकारी रातोरात मिंधे गटात सामिल होत असताना संजय राऊत यांची निष्ठा अढळच राहिली नाही तर तुरूंगवासाने तावून सुलाखून २४ कॅरेट शुद्ध असल्याचे सिद्ध झाल्याने संजय राऊत हे निष्ठावंतांचे आयकॉन ठरले.
अनिल थत्ते यांनी त्यांच्या खाजगी वाहिनीवर तीन महिन्यापुर्वी ” संजय राऊत यांची हत्या होण्याची भीती” व्यक्त केली होती. सद्याचे जे सूडाचे व रक्तरंजीत राजकारण सुरू आहे, त्यावरून तरी अनिल थत्तेंची भीती निराधार वाटत नाही.
अनिल थत्ते हे खळबळजनक विधानं करून धमाल उडवून देण्यासाठी प्रसिद्ध आहेत.त्यांच्या सुमारे पन्नास वर्षाच्या पत्रकारितेत अनेक वादग्रस्त विधानं/ दावे केले. ते खरे ठरले असा दावा अनिल थत्ते सुद्धा म्हणणार नाहीत.
गगनभेदी अनिल थत्ते यांनी त्यांच्या खाजगी चॅनेलवर केलेला गौप्यस्फोट खळखळजनक तर आहेच परंतू महाराष्ट्राच्या राजकारणाला कलंकित करणारे आहे. शिवसेनेचे फायरब्रॅन्ड नेते ज्यांनी १०३ दिवस कारावास भोगला परंतू ते भाजपाच्या दबावतंत्रापुढे झुकले नाहीत,त्यांच्याच हत्येची शक्यता वर्तवली आहे.
एरवी आपण अनिल थत्तेंची गगनभेदी थापेबाज म्हणून संभावना करतो.मात्र अनिल थत्ते व संजय राऊत हे जीवलग मित्र आहेत, याबद्धल कोणाचेही दुमत होऊ शकत नाही. तसेच वरील मुलाखतीत अनिल थत्ते ज्या आत्मियतेने बोलत आहेत त्याबद्धल शंका घेता येणार नाही. संजय राऊत यांच्या जीवीतास असलेल्या धोक्याचा ते गंभीरपणे उच्चार करताना दिसतात. बाबा सिद्धिकीच्या हत्येनंतर संजय राऊत यांची हत्या होण्याचा धोका ते स्पष्टपणे व्यक्त करतात, त्यात नेहमीचा नाटकी अविर्भाव नसून ते चिंताक्रांत झाल्याचे पदोपदी जाणवते.
याच टॉक शो मधे अनिल थत्ते यांनी संजय राऊतांना धोक्याची सूचना देऊन सावधानतेचा इशारा दिला, असे म्हटले आहे.इतकेच नव्हे तर मित्र प्रेमापोटी त्यांनी संजय राऊत यांना संरक्षण देण्याची विनंती तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही केली होती परंतू त्यांनी हतबलता दर्शवली हे ही सांगितले.नंतर त्यांनी महाराष्ट्राचे तत्कालिन गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही संजय राऊतांना संरक्षण देण्याची विनंती केली परंतू काहीच निष्पन्न झाले नाही. मोदी शहांचा ग्रीन सिग्नल मिळाल्या शिवाय संजय राऊत यांना संरक्षण मिळणार नाही, हे स्पष्ट झाल्याने अनिल थत्ते यांनी आपले सोर्स वापरून पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रिय गृह मंत्री अमित शाहा यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी हा विषय महाराष्ट्र राज्याच्या अखत्यारित येतो, असे म्हणून हात झटकल्याचेही ठामपणे म्हटले आहे.
महायुती व भाजपला संजय राऊत हा मोठा अडसर असल्याने संजय राऊत यांच्या जीवितास नक्कीच धोका आहे.ही निवडणूक महायुतीसाठी अतिशय महत्वाची आहे.ती जिंकण्यासाठी महायुती कोणत्याही थराला जाऊ शकते. एखाद्या नेत्याचा बळी द्यावा लागला तरी ते बळी घेतील,इतकी वाईट परिस्थिती आहे. महायुतीच्या काळात झालेले घोटाळे व प्रचंड भ्रष्टाचार वआर्थिक दिवाळखोरी दडपण्यासाठी व महाविकास आघाडीचे सरकार आल्यास आपली खैर नाही, हे महायुतीचे नेते जाणून आहेत.
एखाद्या गुंडाला तुम्ही संरक्षण देता, अगदी बलात्कारी अक्षय शिंदेच्या नातेवाईकांना पोलीस संरक्षण देता,इतकेच नव्हे तर जिथे अक्षय शिंदेचे प्रेत दफन केले तिथे सीसी कॅमेरे लावता व मृतदेहालाही संरक्षण देतात आणि संजय राऊत यांच्या जीवितास धोका असल्याची सुस्पष्ट कल्पना असताना मोदी,शहा,शिंदे, फडणवीस जर संरक्षण देण्याबाबत हलगर्जीपणा दाखवत असतील आणि देव ना करो आणि अनिल थत्तेची भीती खरी ठरली तर मग हे चारही नेते त्यास जबाबदार राहतील.तसे काही होऊ नये व दुर्दैवाने तसे काही झाले तर महाराष्ट्राची जनता यांना बेचिराख करून टाकेल.
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार
९८२२९०२४७०