December 18, 2024 12:35 pm

धर्मवीरांचा शिष्य भाजपाचा अग्निवीर !

अपनी भाषा में पढ़े! Translate

धर्मवीरांचा शिष्य भाजपाचा अग्निवीर !
प्रचंड आढेवेढे, नाराजी नाट्य, आजारी पडणे, बरे होणे, गावी जाणे परत येणे परत आजारी पडणे, मग वर्षावर मिटींग घेणे, शेवटपर्यंत सस्पेन्स ठेऊन प्रसिद्धीचा फोकस स्वत:भोवती ठेवणे इतके सायास मावळते मुख्य मंत्री एकनाथ शिंदे करावे लागले. अखेर कोणत्याही निमंत्रण पत्रिकेत नामोल्लेख नसतानाही लाचार होऊन शपथविधी सोहळ्यात मुकाट्याने सामिल व्हावे लागले व उपमुख्यमंत्री पद हो तेच उपमुख्यमंत्रीपद स्विकारून स्वत:स पदावनत (Demotion) करून घेत शपथ घेतली. या शपथ विधी सोहळ्यातील एकनाथशिंदे यांची दयनीय अवस्था आमच्या सारख्या विरोधकांनाही पाहवली नाही.पंतप्रधान मोदींनी तर शिंदेला खेटून जाऊनही ढूंकूनही न पाहता थेट देवेंद्र फडणवीस व अजित पवारांना हस्तालोंदन केले. शिवसेनेचा कधीकाळचा वाघ आज शेळी झालेला पाहून महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली. अखेर वर्षा निवासस्थान जड अंत:करणाने सोडणे भाग पडून देवेंद्र फडणवीस व भाजपाचे अंकित होऊन मिळेल ते खाते ( देतील ते ) स्विकारून पाच वर्षासाठी हा धर्मवीरांचा तथाकथित पट्टशिष्य अग्निपथयोजनेतील कंट्राटी अग्निवीर म्हणून भाजपाचे जोखड मानेवर ठेऊन वाटचाल करणार आहे.शपथ विधी संभारंभातील मामु एकनाथ शिंदेंची आसन व्यवस्था ही देवेंद्र फडणवीस व अजित पवारांपासून वेगळीच ठेवली होती,यावरूनही भाजपाने योग्य ते संकेत दिले असावेत.
मामु एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद मिळणार नाही, असे दिल्लीचे त्यांचे अधिपती मोदी शहा यांनी आधीच ठणकाऊन सांगितले होते व गुमानपणे आम्ही टाकतो ते तुकडे चघळत बसा ! नाही तर तुमचाही गेम करू !! असे ठणकावताच मामु एकनाथ शिंदेंचा बंडोबा थंडोबा झाला ! तशी भाजपला एकनाथ शिंदेंच्या पाठींब्याची मुळीच गरज उरलेली नव्हती. २०२२ ची परिस्थिती वेगळी होती.त्यावेळी भाजपचे १०५ + आमदार असतानाही भाजपने ४० गद्दार आमदारांच्या सरदाराला मुख्यमंत्री पद दिले ते काही मुर्ख नव्हते. आपल्या पक्षाशी धोकेबाजी करून व पक्ष प्रमुखाच्या पाठीत खंजीर खुपसण्याची मर्दुमकी शिंदे एण्ड कंपनीने गाजवली होती.ज्या कामधेनुेने त्यांना प्रेम दिले, पदं बहाल केली व २० वर्षे आमदारकी,
मंत्रीपद दिले, पोरसवदा मुलाला खासदारकी दिली तीही एकदा नव्हे तर दोन वेळा, त्यांच्याशी द्रोह करून भाजपाचे चरणदास झाल्याचे इनाम म्हणून मुख्यमंत्री पदाचे गाजर दिले. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मामु देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्य मंत्री पद देऊन वेसण घातली होती.
भाजपला मुंबई वेगळी करून केंद्रशासित करण्यात मोठा अडसर होता तो बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा. तसेच मुंबईची बाजारपेठ व महसुलावर मोदी शहांची वक्रदृष्टी होतीच.जे महाराष्ट्र द्वेष्ट्या मोरारजी देसाईंना जमले नाही ते मोदी- शहांनी एकनाथ शिंदेंना फितुर करून साध्य केले.अखंड शिवसेना दुभंगली मग बाकीचे हेतू साध्य करणे सहजसाध्य होते.कारण एकनाथ शिंदे यांना शिवसेना व धनुष्यबाण मिळवून देऊन त्यांना अंकित करून ठेवले आहे.
या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने ५७ जागा मिळवताच त्यांना पुन्हा मुख्यमंत्री पदाची स्वप्नं पडू लागली होती.त्यांचे शागिर्द संजय शिरसाट व दिपक केसरकर हे शिंदेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत ! असा राग आळवू लागले होते, नवस सायास करून विलापही करू लागले होते, एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या अफवा पेरू लागले.परंतू भाजपच्या आलाकमानने त्यांना २०२२ च्या उपकारांची आठवण करून दिली. ५७ आमदार निवडून आले यात तुमच्या कर्तृत्वापेक्षा भाजपच्या कुटनीतीचे मोठे श्रेय आहे.तुमच्या पाठींब्याची गरज नाही.आमचे १३२ व ५ अपक्षांचा पाठींबा मिळून १३७ आहेत त्यात अजित पवार यांच्या ४१ आमदारांची भर पडून १७८ संख्याबळ होते. याची जाणीव करून दिली.
आपला भाजपापुढे निभाव लागत नाही व जास्त ताणले तर जे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे केले तसे पक्षाचे नाव व चिन्ह गोठवून भाजपात विलिन होण्याची नामुष्की येईल, याची कल्पना येताच एकनाथ शिंदे यांनी मानभावीपणाचा आव आणत “मी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडून देत आहे,” असे जाहीर केले.वास्तविक शिंदेनी भाजपा समोर पत्करलेली ही हाराकिरी होती. परंतू आव असा आणला की मी मोठ्या मनाने पदाचा त्याग करीत आहे.
मामु एकनाथ शिंदे इतकेच बोलून थांबले असते तरी त्यांची मुठ्ठी बंद राहीली असती. परंतू ते वदले की, “भाजपचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो आमच्यासाठी अंतिम असेल.” एका पक्षाचा प्रमुख आपल्या पक्षाचे निर्णय घेऊ शकत नाही व तो अन्य पक्षाचे निर्णय शिरसावंद्य मानत असेल तर तो स्वत: व त्याचा पक्ष भाजपाचा गुलाम आहे,हेच सिद्ध होते.
इतक्यावर हे प्रकरण थांबले असते तरी बरे झाले असते.परंतू मामु एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या शरणागतीचे उदात्तीकरण करून मुलामा देण्याचा लाजीरवाणा प्रयत्न केला.
खुप अभिमान वाटतो बाबा !
अशी टॅगलाईन देत श्रीकांत शिंदे म्हणतात- सत्ता आणि पद हे अनेकदा सार्वजनिक जीवनात वर्चस्व गाजवते.भल्याभल्यांना मोहात पाडते परंतू एकनाथ शिंदे हे याला अपवाद ठरले.त्यांच्यासाठी जनसेवा व राष्ट्रनिर्मिती हे नेहमीच सर्वोच्च प्राधान्य राहीले आहे.
सत्ता आणि पदासाठी मामु एकनाथ शिंदे यांनी किती खालची पातळी गाठली हे जगभर कुप्रसिद्ध झाले आहे. सत्ता व पदाच्या मोहापायीच त्यांनी शिवसेनेशी गद्दारी करून शिवसेना संपवू पाहणा-या भाजपाच्या कच्छपि लागले ते अपवाद ठरले नाहीत.यावेळी त्यांची बार्गेनिंग पॉवर नसल्याने त्यांनी यशस्वी माघार घेतली आहे.त्यांना जर ९० जागी यश आले असते तर त्यांनी अजित पवारांशी संगनमत करून मुख्यमंत्री पद मिळवले असते. सगळेच राजकारणी सत्ता संपादनाची शिडी म्हणून जनसेवा करतात. परंतू राष्ट्रनिर्मिती करण्याएवढी उंची अजून तरी शिंदेंनी गाठलेली नाही. पितृभक्त पुत्राला तसे वाटल्यास नवल नाही. त्यांचे शेवटचे वाक्य तर हास्यास्पद आहे.- “आणि त्यांचा वारसा पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील.”
एकनाथ शिंदेंनी मातृतूल्य पक्षाच्या गर्भावर वार केले, आश्रयदात्या व भाग्यविधात्या पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच्या गंभीर आजारपणाचा फायदा घेऊन पक्षाचे आमदार पळवून नेले, हा आदर्श पुढील पिढ्यांना हीच प्रेरणा देत राहील का ? आपली तत्व, निष्ठा पायदळी तुडवत पक्ष विरोधी भाजपाच्या गुलामीचा पट्टा गळ्यात बांधुन मिरवणारे मामु एकनाथ शिंदे हे पुढील पिढ्यांना गद्दारीचा वारसा देणार आहेत का ?
पितृप्रेम समजू शकते कारण ते नसते तर हे खासदार एखाद्या रूग्णालयात सर्जरी करत बसले असते, परंतू त्यांचे गुणगान गाताना पुढील पिढ्यांना खोटा इतिहास सांगून भ्रमित करू नये,इतकीच अपेक्षा !
मामु एकनाथ शिंदेंनी नाईलाजास्तव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून बिनशर्त माघार घेतली, व भाजपाने शिंदे या धर्मवीर शिष्यास अग्नीवीर करून उपमुख्यमंत्री पदाचे गाजर देऊन पाच वर्षांसाठी जखडून ठेवले, हे त्रिकालाबाधित सत्य त्यांनी नाकारू नये, हाच या लेखा मागील लेखन प्रपंच आहे.
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार
९८२२९०२४७०

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!