महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा – उमेश चव्हाण, अध्यक्ष रुग्ण हक्क परिषद
दि. 18/11/2024
प्रतिनिधी – कैलास कांबळे, दौंड.
पुणे दि. १८ नोव्हें.- पुण्यातील वाहतूक कोंडी प्रचंड वाढलेली आहे. लहान मुली आणि महिलांवरील बलात्काराच्या प्रकरणातील गुन्हेगारावर गृहखात्याचा वचक राहिलेला नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा महत्त्वाचा आणि संवेदनशील ठरत आहे. पोलिसांच्या समोर विचारवंतांच्या सभा उधळून लावण्याचे प्रकार सुरू आहेत. भाषण करण्याचे स्वातंत्र्य असले तरी झुंडशाहीने मुस्कटदाबी करणाऱ्या प्रकारांना आळा घातला जात नाही तर प्रोत्साहन दिले जात आहे. कर्तबगार पोलिसांना बघ्याची भूमिका घ्यावी लागत आहे. महागाई वाढली आहे. गॅस सिलेंडर, डाळी, जीवनावश्यक वस्तू प्रचंड महाग झाल्या आहेत. अन्नपदार्थावर टॅक्स लावलेला आहे. एकेक औषध – इंजेक्शनाच्या किमती १ लाख रुपयावर गेल्या आहेत. आरोग्य व्यवस्था प्रचंड महाग झाली आहे. सीजीएचएसच्या दराप्रमाणे कोणतेही हॉस्पिटल बिल आकारत नाही, रुग्णांना लाखो रुपयांचे भरमसाठ बिल दिले जात असताना महायुतीचे सरकार त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. दुचाकी वरून चालणाऱ्या गरिबांच्या लेकरांना चिरडून ठार मारणाऱ्या श्रीमंतांच्या मस्तवाल पोरांना महायुतीचे आमदार वाचवीत आहेत. कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. ५० खोके देऊन आमदार फोडले गेले आहेत. गरिबांच्या प्रश्नाकडे, तरुणांच्या प्रश्नाकडे, विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे, बेरोजगारीच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक महायुती सरकारने दुर्लक्ष केले आहे. महायुती सरकार घालवले पाहिजे आणि राहुल गांधी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांनाच जनतेने स्वतःच्या भल्यासाठी निवडून दिले पाहिजे, असे आवाहन रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी केले.
पुण्यातील सुजाण जागरूक मतदारांनी हडपसरमध्ये प्रशांत जगताप, वडगाव शेरी मध्ये बापूसाहेब पठारे, कसब्यामध्ये रवींद्र धंगेकर, पर्वतीमध्ये अश्विनी कदम, कोथरूडमध्ये चंद्रकांत मोकाटे, पुणे कॅन्टोन्मेंट मध्ये रमेशदादा बागवे, शिवाजीनगर मध्ये दत्ता बहिरट आणि खडकवासल्यामध्ये सचिन दोडके यांनाच निवडून दिले पाहिजे, असेही रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण म्हणाले.
उमेश चव्हाण पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्षाच्या आणि महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये प्रत्येक नागरिकाला २५ लाखापर्यंतचे उपचार मोफत द्यावेत आणि महागडी इंजेक्शन व औषधे मोफत द्यावीत, असा उल्लेख करण्याची आणि महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर याबाबींची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी रुग्ण हक्क परिषदेने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्या समोर जाहीर सभेत केली होती, या मागणीस तात्काळ प्रतिसाद देऊन २५ लाखापर्यंतचे मोफत उपचार व मोफत औषधांचा मुद्दा महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये प्रथम क्रमांकावर घेतल्यामुळे येथील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे, त्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी केले.