अतिशय दुर्दैवी व धक्कादायक घटना !
हर्षवर्धन पालांडेचा मि’धे गटात प्रवेश !
संपर्क नेते गुरूनाथ खोत यांच्या नाकर्तेपणाचा बळी ! अजून असे किती मोहरे गमावल्यावर डोळे उघडणार !
निष्पक्ष पत्रकारिता ( भाग-१ )
काल दुपारीच पालांडेंचा मला फोन आला. खुपच हताश झालेले जाणवले.
आपल्याला काहीच किंमत नाही,
मातोश्रीवर आपले कोणी ऐकत नाही,मी राजिनामा द्यायचा विचार करीत आहे. असं ते बोलले.मी ही त्यास हरकत नाही असे म्हटले. मला कल्पनाही नव्हती की ते शिवसेना उबाठा सोडतील. मला वाटलं आपल्या जिल्हा समन्वयक पदाचा ते राजिनामा देतील. पण घडले भलतेच.
विवेक खामकर गेले, सदानंद थरवळ गेले, त्यापुर्वी लोकसभे दरम्यान डोंबिवलीच्या अनेक रणरागिणी व उल्हासनगर- अंबरनाथचे शेकडो शिवसैनिक सोडून गेले. काही दिवसांपुर्वी तर अनेक ज्येष्ठ पदाधिका-यांना निलंबित केले गेले. ही गळती का लागली ? कोणाच्या नाकर्तेपणामुळे व चापुलीसी मुळे ही गळती लागली ? मातोश्री भोवती घट्ट विळखा घालून बसलेले नागोबा कोण ? हे वारंवार सिद्ध झाले आहे. आधी मिलिंद नार्वेकर यांच्या बाबतीत जी बोंब होती त्यापेक्षा किती तरी अधिक पटीने विनायक राऊत हे या बाबतीत घातक ठरत आहेत. साहेबांच्या अवती भवती सतत रेंगाळत राहून साहेबांना एकांगी व अर्धवट माहिती देऊन दिशाभूल करण्याचे काम राऊत करतात.यापुर्वी ते खासदार असल्याने थोडे तरी बिझी होते परंतू आत्ता तर ते पराभूत झाल्याने फुल्ल टाईम मोकळे आहेत,त्यामुळे कान फुंकण्याच्या कामात त्यांना भरपुर सवड मिळते.त्यांच्या जोडीला कल्याण लोकसभा मतदार संघाचे संपर्क नेते गुरूनाथ खोत आहेतच. लोकसभा निवडणूकीत २ लाख इतक्या मतांनी पराभव पत्करावा लागला तो यांच्यामुळेच. तरी ते व त्यांचे समर्थक पराभवाला मुलामा देऊन उदात्तीकरण करू पाहत होते.त्याच वेळी मी उद्धव साहेबांना सर्वांसमोर बोललो होतो की,पराभवाचे आत्मपरिक्षण करण्या ऐवजी ते मताधिक्य कमी झाले, ३.८० लाख मतं मिळाली, असा पराभवाला मुलामा देत आहेत.
*आपण महाराष्ट्र जिंकायला निघालो आहोत, आपल्याला उद्धव साहेबांना मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेले पहायचे आहे. परंतू चुकिच्या धोरणामुळे जर असे एक एक मोहरे गळायला लागले तर राज्य कसे जिंकणार ?* तानाजी मालूसरे यांनी गड जिंकला परंतू प्राण गमावले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज उद्गारले होते,गड आला पण सिंह गेला ! इथे तर गड जिंकण्यापुर्वीच असंख्य सिंह धारातीर्थी पडत आहेत. गेली २.५ वर्षे जे नेटाने मिंधेंशी लढले ते यावेळी का शस्त्र म्यान करून शरणागती पत्करत आहेत?
जे नाराज आहेत त्यांची नाराजी दूर करणे व आपल्या सोबत ठेवणे यातच नेत्यांचे कौशल्य पणाला लागते. परंतू या बाबतीत
मातोश्रीवरील “बडवे” सपशेल फेल ठरले आहेत. गेला तर जाऊ दे काही फरक पडत नाही ! या वृत्तीमुळे मिंधेने ४० आमदार फोडण्यात यश मिळवले.आज नाराजांची फौज आहे. परंतू निव्वळ निष्ठेपायी ते टिकून आहेत. विजय साळवी सारखा उपनेता नाराज असूनही कोणी दखल घेत नाही. माजी महापौर रमेश जाधव,आशा रसाळ, जानू मानकर व मी स्वत: असे शेकडो शिवसैनिक नाराज आहेत. ही नाराजी दूर करण्या ऐवजी भिजत घोंगडं ठेवलं जात आहे.
हर्षवर्धन पालांडे व रमेश जाधव हे इच्छूक उमेदवार होते,उमेदवारी देताना त्या़ंना फक्त डावललेच नाही तर चोर वाटेने उमेवारी दिली गेली.त्यामुळे ते नाराज होते.त्यांची नाराजी दूर करण्यात अपयश आले. त्यांची मागणी एकच होती की, जिल्हा प्रमुखाला उमेदवारी दिलीच आहे तर त्यांच्या जागी आमच्या पैकी एकाची नेमणूक करा ! परंतू खाल्या मिठाला जागलल्या गुरूनाथ खोत यांनी नकार घंटा वाजवली.लोकसभे आधी जे केले तेच आत्ताही करीत आहेत. त्यांनी जर पालांडेंना कल्याण जिल्हा प्रमुख केले असते तर पालांडे प्रमाणेच रमेश जाधव व आशा रसाळ यांची नाराजी दूर झाली असती.परंतू विनायक राऊत व गुरूनाथ खोत या जोडगोळीने मिठाला जागून ते होऊ दिले नाही.त्यामुळे ही जोडगोळीच या मतदार संघातील वाताहातीस जबाबदार आहे.या नेत्यांनी व्यक्तिनिष्ठ गलिच्छ राजकारण सोडले नाही तर मात्र काही खरे नाही. उद्या आणखीन काही मोहरे गळाले तर त्याला जबाबदार हीच जोडगोळी असेल,तूर्तास इतकेच !
दिलीप मालवणकर
९८२२९०२४७०