ग्राविकासासाठी सरपंच व ग्रामसेवक यांच्यातील सुसंवाद महत्वाचा ‘धुळे जिल्हा – सरपंच संसदेत’ श्री.विशाल नरवाडे यांचे प्रतिपादन
धुळे जिल्ह्याचे जि.प.कार्यालय व पं.स.कार्यालयात सरपंच दालन व संगणक कर्मचारी या मागण्याना सीईओ कडून मंजुरी.
शिरपूर प्रतिनिधी : सरपंच व ग्रामसेवक ही ग्रामविकासाच्या रथाची दोन चाके आहेत. त्यांच्यात सुसंवाद असल्याशिवाय ग्रामविकासाची प्रक्रिया गतिमान होऊ शकणार नाही,
असे प्रतिपादन धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.विशाल नरवाडे यांनी ‘धुळे जिल्हा – सरपंच संसदे’त मार्गदर्शन करतांना केले.
‘एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट’ अंतर्गत स्थापित ‘राष्ट्रीय सरपंच संसद’, ‘धुळे जिल्हा परिषद’ व
‘महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन’ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि
‘शिरपूर एज्युकेशन सोसायटी’च्या सहकार्याने मंगळवार दि.24 सप्टेंबर 24 रोजी शिरपूर येथे ‘आर.सी. भंडारी सभागृहा’त ‘धुळे जिल्हा – सरपंच संसदे’चे भव्य आयोजन करण्यात आले होते.
‘ धुळे जिल्हा – सरपंच संसदे’त शिरपूर तालुक्यातील ताजपुरी ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. हेमंत सनेर यांनी सर्व सरपंचांच्यावतीने धुळे जिल्ह्याचे जि.प.कार्यालय व चार तालुक्यातील पं.स.कार्यालयात सरपंच दालने व संगणक कर्मचारी मिळावेत अशी मागणी सीईओ श्री.विशाल नरवाडे यांच्याकडे केली. त्यांनी ती मागणी त्वरित मान्य करून अग्रक्रमाने या मागण्यांची पूर्तता केली जाईल अशी घोषणा केली. सरपंचांनी अतिशय आनंदाने जल्होष करीत या घोषणेचे स्वागत केले व सरपंच संसदेच्या आयोकांना धन्यवाद दिले.
धुळे जिल्ह्यातील सर्व विद्यमान सरपंच,उपसरपंच आणि ग्रामसेवक यांना एकाच मंचावर एकत्रित आणणे व ग्रामविकासाच्या संबंधित विविध विषयांवर अनुभवी, तज्ञ मान्यवरांचे त्यांना मार्गदर्शन मिळवून देणे हे ‘धुळे जिल्हा – सरपंच संसद’ आयोजनाचे प्रमुख उद्दिष्ट होते. ‘एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट’चे प्रणेते श्री.राहुल कराड यांची ही संकल्पना होती व तिला कार्यान्वित करण्यासाठी ‘शिरपूर जलसंवर्धन पॅटर्न’चे प्रणेते श्री अमरीशभाई पटेल यांचे सहकार्य मिळाले. एक संपूर्ण दिवसभराच्या कालावधीत चार सत्रात या संसदेचा कार्यक्रम झाला.
प्रमुख अतिथी धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.धरतीताई देवरे, सत्राचे वक्ते ग्रामविकासतज्ञ डॉ.उज्ज्वलकुमार चव्हाण, धुळे जि.प.चे सीईओ श्री.विशाल नरवाडे, बारीपाडाचे शिल्पकार श्री.चैत्राम पवार व ‘एफ.पी.ओ.फेडरेशन’ चे अध्यक्ष डॉ.संजय पांढरे यांच्या हस्ते प्रथम सत्रात दीपप्रज्ज्वलन करून संसदेस प्रारंभ करण्यात आला.
‘शिरपूर एज्युकेशन सोसायटी’ चे संचालक श्री.राजगोपाल भंडारी, ‘राष्ट्रीय सरपंच संसदे’चे प्रमुख समन्वयक श्री.योगेश पाटील, सहसमन्वयक श्री.प्रकाशराव महाले,महाराष्ट्र राज्य संघटक डॉ.नामदेवराव गुंजाळ,धुळे जिल्हा अध्यक्ष श्री.जगदीश देवरे,धुळे जिल्हा महिला समन्वयक सौ.जयश्रीताई अहिरराव,धुळे जिल्हा संघटक श्री.गोटूजी चौरे, धुळे तालुका अध्यक्ष श्री. जयसिंग गिरासे, साक्री तालुका अध्यक्ष श्री.जितेंद्रकुमार कुवर, शिरपूर तालुका अध्यक्ष श्री.नेपालसिंग राजपूत, सिंदखेडा तालुका अध्यक्ष श्री.देवानंद बोरसे व महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे धुळे जिल्हा अध्यक्ष श्री.प्रफुल्लकुमार शिंदे हे यावेळी मंचावर उपस्थित होते. श्री.प्रकाशराव महाले व श्री. प्रफुल्लकुमार शिंदे यांनी ‘राष्ट्रीय सरपंच संसद’ व ‘ग्रामसेवक युनियन’ यांच्यावतीने प्रारंभी सर्वांचे स्वागत केले.श्री.योगेश पाटील यांनी प्रास्ताविक केले.
प्रथम सत्रात ‘ग्रामविकासासाठी – जलसंवर्धन व जलव्यवस्थापन’ या विषयावर डॉ.उज्ज्वलकुमार चव्हाण, सौ.धरतीताई देवरे व श्री.विशाल नरवाडे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. जलनायक श्री.अमरीशभाई पटेल यांच्या कृतिशीलतेतुन साकारलेल्या ‘शिरपूर जलसंवर्धन पॅटर्न’ च्या चित्रफितीचे सादरीकरण करून या यशस्वी प्रयोगाची माहिती श्री.जितेंद्र पाटील यांनी दिली.
दुसऱ्या सत्रात धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील बारीपाडा या गावांत ग्रामविकासाचे विविध कार्यक्रम यशस्वी करीत या गावाला आदर्शगावात रूपांतरित करणारे शिल्पकार श्री.चैत्राम पवार यांनी बारीपाड्याची यशोगाथा सांगून सरपंचांना प्रेरित केले.
‘बांबू शेती व उद्योग – ग्रामविकासाची नवीन दिशा’ या विषयावर ‘भारत बांबू असोसिएशन’ चे संचालक श्री.अमित पाटील सखोल मार्गदर्शन केले.
भोजनानंतर तिसऱ्या सत्रात ‘टाटा सामाजिक विज्ञान संस्थे’ चे संशोधक श्री.श्रेयस पन्नासे, सीएसआर निधी व्यवस्थापन तज्ञ श्री.नितीन राजवैद्य व ‘फार्मर्स प्रोड्युसर कंपनी फेडरेशन’चे अध्यक्ष डॉ.संजय पांढरे यांनी अनुक्रमे ‘सामाजिक वन हक्क कायदा समिती’,’ सीएसआर निधी संकलन व व्यवस्थापन’ व ‘ एफ.पी.सी. – स्थापना व व्यवस्थापन’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.
‘प्रशासकीय अधिकारी – सरपंच संवाद’ या विषयावरील सत्रात शिरपूर तालुका सरपंच महासंघाचे अध्यक्ष श्री योगेंद्रसिंग सिसोदिया, ताजपुरी चे सरपंच श्री.हेमंत सनेर, वाठोडा सरपंच श्री नारायण कोंडूसिंग चौधरी, अहिल्यापूर सरपंच श्री संग्रामसिंग राजपूत, पाथर्डे सरपंच देविदास पाटील, अजंदे सरपंच श्री राजेंद्र पाटील, भाडणे चे सरपंच श्री.अनिल सोनवणे, जोगशेलूच्या सरपंच सौ.ज्योतीताई देसले, यांनी अनुक्रमे शिरपूर, साक्री, शिंदखेडा व धुळे या तालुक्यातील ज्वलंत ग्रामविकासविषयक समस्यांचे सादरीकरण केले. श्री.विशाल नरवाडे यांनी त्या समस्यांच्या निराकरणासाठी मार्गदर्शन केले.
‘राष्ट्रीय सरपंच संसदे’चे धुळे जिल्हा अध्यक्ष श्री.जगदीश देवरे आभार मानले. ग्राम स्वच्छतेविषयी सर्वांनी शपथ घेतली. राष्ट्रगीताने ‘धुळे जिल्हा – सरपंच संसदे’ची सांगता करण्यात आली.
सौ.उर्मिलाताई पाटील व सौ.कविताताई चौधरी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.