भाजपमध्ये प्रवेश करायचा. यापेक्षा मला असं वाटतं की आपलं आपलं घरी बसावं आणि आपलं काम करावं..
मार्मिक न्यूज नेटवर्क : विक्की जाधव
नुकतीच झालेल्या एका वृत्त वहिनीच्या मुलाखतीत एकनाथ खडसे यांनी पाटबंधारे मंत्री असताना घेतलेली निर्णय, केलेली कामे आणि आतापर्यंत यशस्वी आणि अयशस्वी झालेल्या कामांबाबत चर्चा करण्यात आली. एकनाथ खडसे यांनी मनमोकळेपणाने यावेळी प्रतिक्रिया दिली.
गेल्या काही महिन्यांपासून एकनाथ खडसे हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. भाजपकडून एकनाथ खडसे यांना राज्यपाल पदाची मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. याबाबत एकनाथ खडसे यांनी उद्विग्नपणे आपली प्रतिक्रिया दिली.
मोठी जबाबदारी मिळेल त्यावेळेस खरं, अशी माझी भूमिका आहे. त्याबाबत कुठलीही सूचना मला आलेली नाही. किंबहुना भाजपमध्ये प्रवेशाबाबत निर्णय झाला नाही तर पुढच्या मोठी जबाबदारीच्या विचाराचं काय करत बसायचं? आज मला भाजपमध्ये प्रवेश करायचा तर चार महिने वाट धरावी लागते. यापेक्षा मला असं वाटतं की आपलं आपलं घरी बसावं आणि आपलं काम करावं. चार महिने झाले. तुम्हाला मी चार महिन्यात ही पहिली मुलाखत देत आहे. चार महिन्यात मी कुणाला टीव्हीवर मुलाखत दिली नाही. कारण वाद नको”, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली. यावेळी खडसे यांना एवढा मोठा नेता, या नेत्यासोबत असं काही घडतंय? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर खडसेंनी “काय बोलणार? हे खान्देशाचं दुर्दैव आहे”, अशी उद्विग्न प्रतिक्रिया खडसेंनी दिली.
‘अशा अनेक पुड्या बाहेर पडत असतात’
यावेळी एकनाथ खडसे यांना राज्यपाल होणार ही पुडी कशी पाहेर पडली? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “अशा अनेक पुड्या बाहेर पडत असतात. कसं असतं शेवटी राजकारण असतं, निवडणुका असतात. लोकसभेच्या निवडणुका होत्या. अनेक निवडणुकांना कधीकधी माझीही मदत लागत होती. राजकारणाच्या दृष्टीकोनातून काही सोयीचे भाषणं करायची असतात”, असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं.
एका टिंबा एवढं तरी नाव नाथाभाऊचं लिहिल्या शिवाय…’
लोकांपर्यंत तुमचं काम पोहोचत नाही का? असा प्रश्न खडसेंना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “लोकांपर्यंत कामे पोहोचत नाहीत तसं नाही. खान्देशातील प्रत्येक सुजाण नागरिकाला माहिती आहे की, नाथाभाऊंनी हे सर्व प्रकल्प सुरु केले आहेत. त्यांना त्याविषयी आस्था आहे. आजपर्यंत 30 वर्षे झाली, पक्ष म्हणून विचार करायचा, तर 30 वर्षात खान्देशातील या सर्व मंडळींनी मला खासदार सर्वाधिक निवडून दिले, आमदारही सर्वाधिक प्रमाणात निवडून दिले. आमचे 22 वेळा खासदार निवडून आले. अकरावेळा निवडणुका झाल्या १९८९ पासून केवळ दोन वेळा आम्ही हारलो. हे खान्देशवासीयांनी दिलेलं प्रेम आहे. बाकी कुणाला काहीही वाटो. पण खान्देशीवासीयांनी हे नाथाभाऊला दिलेलं प्रेम आहे. मला हे गावागावात आणि तालुका-तालुक्यात जाताना हे जाणवतं. जे सुजाण नागरीक आहेत ते निश्चित जाणतात. इतिहास ज्यावेळी लिहिला जाईल त्यावेळी एका कोपऱ्यात एका ठिकाणी तरी एका टिंबा एवढं तरी नाव नाथाभाऊचं लिहिल्याशिवाय जळगाव जिल्ह्याचा इतिहास होऊ शकणार नाही”, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली.