“शासकीय जागेतील अतिक्रमण भोवले अन् फुटजवळगावच्या सरपंचाचे पदच गेले ….”
प्रतिनीधी / अजिनाथ कनिचे
श्री. अमर दत्तात्रय पवार यांच्या पाठपुराव्यास यश
फुटजवळगाव ता-माढा येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. अमर दत्तात्रय पवार यांनी दिनांक २९/०५/२०२३ रोजी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ कलम १४(१)(ज-३) अन्वये शासकीय जागेतील अतिक्रमण प्रकरणी ग्रामपंचायत सरपंच सौ. शोभा बापू पवार यांच्या विरुद्ध त्यांचे ‘ग्रामपंचायत सरपंच ‘ पद रद्द करणे करिता मा.जिल्हाधिकारी सोलापूर यांचे न्यायालयात पुराव्याच्या कागदपत्रांसह तक्रार दाखल केली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, सरपंच शोभा पवार यांचे पती श्री. बापू शिवदास पवार यांनी सीना माढा पाटबंधारे विभागाच्या जमीनीवर कायमस्वरुपी पत्राशेड मारुन सरकारी जमीनीवर अतिक्रमण केले होते.
सरपंच व तिच्या पतीने कायमस्वरुपी पत्राशेड मारुन सरकारी जमिनीवर अतिक्रमण केले आहे . सरपंच शोभा पवार व पती यांचे नावे असणाऱ्या घर क्रमांक 57 त्याचे क्षेत्रफळ 2355 चौ. फुट मध्ये राहतात . सरपंच यांच्या घराजवळ सीना माढा
पाटबंधारे विभागाची जमीन असून त्या जमीनीमधून पाणीपुरवठा विभागाची पाईप लाईन असून त्यावर सरपंच पवार यांनी पत्राशेड बांधलेले होते.
उपविभागीय अधिकारी सिना-माढा प्रकल्प, उपविभाग क्र. 01. भिमानगर यांचेकडून दिनांक 10/07/2023 रोजी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या न्यायालयात अहवाल सादर केलेला होता. सदर अहवालानुसार सरपंच व त्यांचे पती यांनी शासनाने संपादित केलेल्या जागेवरती अतिक्रमण करुन पत्राशेड बांधल्याचे निष्पन्न होते.
याबाबत
मा. जिल्हाधिकारी सोलापूर यांनी तक्रारदार व जाब देणार यांना सुनावणीची संधी देऊन सदर प्रकरणी दिनांक २०/०३/२०२४ रोजी आदेश व निकालपत्र पारित करून तक्रारदार यांचा विवाद अर्ज मंजूर करून सौ. शोभा बापू पवार यांचे ग्रामपंचायत सदस्य व सरपंच म्हणून चालू राहण्यास निरर्ह ठरवून अपात्र घोषित केले.
याप्रकरणी तक्रारदार श्री. अमर दत्तात्रय पवार यांचे वतीने अॅड. आशिष वानखेडे, ॲड. सुनील बनसोडे व ॲड. अजिंक्य संगीतराव यांनी काम पाहिले. अशी माहिती श्री. अमर दत्तात्रय पवार यांनी दिली..